अयोध्येतील राम मंदिरात 'श्री राम यंत्र' बसवले
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पूजा आणि प्रार्थना
वृत्तसंस्था/अयोध्या
अयोध्येत ‘रामजन्मभूमी’च्या स्थानी साकारण्यात आलेल्या भव्य राम मंदिरात, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘श्रीराम यंत्रा’ची स्थापना करण्यात आली आहे. गुरुवारी गुढीपाडव्याच्या शुभदिनी हा कार्यक्रम अमाप उत्साहात पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वेदमंत्रांच्या घोषात या ‘श्रीराम यंत्रा’ची विधिवत् पूजा केली आणि त्याची स्थापना केली. या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक मान्यवर आणि प्रचंड संख्येने रामभक्त उपस्थित होते. अत्यंत भक्तीमय आणि उत्साही वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला.
या ‘श्रीराम यंत्रा’चे वजन 150 किलोग्रॅम आहे. स्थापनेचा हा कार्यक्रम अत्यंत शुभ असणाऱ्या ‘अभिजित मुहूर्ता’वर करण्यात आला. या स्थापना कार्यक्रमासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे दिल्लीहून गुरुवारी सकाळी अयोध्येच्या वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, तसेच उत्तर प्रदेशचे दोन्ही उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक उपस्थित राहिले. त्यानंतर मुर्मू यांचे कारने अयोध्येच्या भव्य राम मंदिरात आगमन झाले. नंतर त्यांनी पुरोहितांच्या मार्गदर्शनात आणि वेदमंत्रांच्या घोषात या ‘श्रीराम यंत्रा’ची स्थापना केली. त्या साधारणत: चार तास भगवान श्रीरामलल्लाच्या मंदिरात होत्या. त्यांना परिसर दाखविण्यात आला. या कार्यक्रमानंतर आदित्यनाथ यांचे भाषणही झाले.
विरोधकांवर जोरदार टीका
‘हिंदू समाजाच्या आस्थांना आणि भावनांना काही लोक अंधश्रद्धा मानतात. असे लोक हिंदू धर्माला अपमानित करीत आहेत. तथापि, असे लोक स्वत: अंधश्रद्ध आहेत. ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असताना नोएडाला जात नव्हते. कारण नोएडाला गेल्यास मुख्यमंत्रीपद जाते, अशी त्यांची भावना होती. आज हेच अंद्धश्रद्ध लोक आमच्यावर टीका करतात. काशी विश्वेश्वर धाम निर्माण करणे, मथुरा वृंदावनाची चर्चा करणे, या कृती त्यांनी अंधश्रद्धा ठरविलेल्या होत्या. पण सत्ता वाचविण्यासाठी नोएडाला न जाणे, ही त्यांच्यासाठी अंधश्रद्धा नव्हती, असा घणाघाती आरोप मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या भाषणात केला.
…हे नाही केवळ मंदिर
अयोध्येत रामजन्मभूमीच्या स्थानी साकारण्यात आलेले हे भव्य राममंदिर केवळ एक मंदिर नसून ते भारताच्या राष्ट्रमंदिराचे प्रतीक बनले असून ते रामराज्य या संकल्पनेचा आधार बनले आहे. हे मंदिर भारताचे प्रेरणास्थान म्हणून प्रसिद्धीस पावले आहे. मंदिराची ख्याती जगभर पसरली आहे, अशी भलावण त्यांनी केली. या राम मंदिराच्या निर्माणकार्यासाठी गेल्या साडेपाचशे वर्षांपासून हिंदू समाज संघर्ष करीत होता. या अथक आणि अखंड प्रयत्नांमुळे आणि देशभरातील लक्षावधी रामभक्त ‘करसेवकां’च्या त्यागामुळे हे यश मिळाले, अशा अर्थाचे प्रतिपादनही मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी केले.

‘श्रीराम यंत्र’ म्हणजे नेमके काय…
सनातन हिंदू धर्मामध्ये प्रत्येक देवतेचे एक यंत्र असण्याचा नियम आहे. प्रत्येक देवाच्या आणि देवतेच्या मंदिरात अशा ‘यंत्रा’ची स्थापना केलेली असते. या ‘यंत्रा’ची नित्य पूजा केली जाते. अशा पूजेचे लाभही हिंदू धर्मग्रथांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहेत. ज्या प्रमाणे ‘श्री यंत्र’, ‘कुबेर यंत्र’ आणि ‘नवग्रह यंत्र’ असते, तसेच ‘श्रीराम यंत्र’ही आहे. ‘श्रीराम यंत्रा’ला प्रभू रामचंद्रांच्या सामर्थ्याचे प्रतीक मानण्यात येते. ‘श्रीराम यंत्रा’चा देवगुरु बृहस्पती यांच्याशी निकटचा संबंध आहे, असे अनेक धर्मतज्ञांचे म्हणणे आहे. या ‘श्रीराम यंत्रा’च्या स्थापनेमुळे अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या सांस्कृतिक वैभवात मोठी भर पडल्याची भावना आहे. ‘श्रीराम यंत्रा’च्या स्थापनेमुळे आणखी एक धार्मिक प्रक्रिया पार पडली आहे.
'श्री राम यंत्रा'चे महत्त्व अपार आहे.
- ‘श्रीराम यंत्रा’च्या स्थापनेमुळे अयोध्येच्या सांस्कृतिक वैभवात मोठी भर
- अयोध्येतील भव्य राममंदिर हे संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान : आदित्यनाथ
- वेदमंत्रांच्या घोषात अत्यंत शुभ ‘अभिजित’ मुहूर्तावर ‘श्रीराम यंत्र’ स्थापन
Comments are closed.