शेअर बाजारात 'रंबल'
गुंतवणुकदारांचे 12 लाख कोटींचे नुकसान : युद्धाचा परिणाम
- 2,496 अंकांनी कोसळला सेन्सेक्स
- 775 अंकांची ‘निफ्टी’मध्ये घसरण
वृत्तसंस्था/मुंबई
भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी गुरुवार हा एक ‘विनाशकारी’ दिवस ठरला. लार्ज-कॅपपासून स्मॉल-कॅपपर्यंत प्रत्येक क्षेत्रात घसरण झाली. मध्य-पूर्वेतील सुरू असलेल्या युद्धादरम्यान आता ‘तेल युद्धा’ला प्रारंभ झाल्यामुळे शेअर बाजारातील वातावरण बिघडले. बीएसई सेन्सेक्स जवळपास 2,500 अंकांच्या घसरणीसह बंद झाला, तर एनएसई निफ्टी 775 अंकांनी घसरला. बाजारातील या विध्वंसाने गुंतवणूकदारांचे अंदाजे 12 लाख कोटी रुपये बुडाल्याचे दिसून येत आहे. यापूर्वीच्या म्हणजेच बुधवारी सायंकाळी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 438 लाख कोटी रुपये होते. गुरुवारी बाजार बंद होताना हा आकडा 426 लाख कोटींपर्यंत घसरल्याचा अंदाज आहे. भारतासोबतच जपान, कोरिया आणि हाँगकाँगसह इतर आशियाई बाजारांमध्येही मोठे नुकसान झाले.
शेअर बाजारात गुरुवार, 19 मार्च रोजी 22 महिन्यांतील सर्वात मोठी घसरण दिसून आली. सेन्सेक्स 2,497 अंकांनी (3.26 टक्के) घसरून 74,207 वर बंद झाला. निफ्टी निर्देशांकही 776 अंकांनी (3.26 टक्क्के) घसरून 23,002 पर्यंत खाली आला. यापूर्वी, 4 जून 2024 रोजी सेन्सेक्स 5.74 टक्क्यांनी घसरला होता. गुरुवारी बँकिंग आणि ऑटो शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आली. निफ्टी बँक, निफ्टी ऑटो, निफ्टी आयटी, निफ्टी एफएमसीजी आणि पीएसयू बँक्समध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आली. या बाजारपेठेतील घसरणीमुळे सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरणीसह बंद झाले.
शेअर बाजारातील या घसरणीमागे अनेक कारणे असल्याचे दिसून येते. भू-राजकीय तणाव आणि युद्धसदृश परिस्थितीमुळे महागाई वाढण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे कंपन्यांचा नफा कमी होऊ शकतो. परिणामी, गुंतवणूकदार आपले शेअर्स विकून सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करू लागल्यामुळे बाजारात घसरण सुरू आहे. मध्य-पूर्वेतील सुरू असलेल्या युद्धादरम्यान तेल आणि वायू प्रकल्पांवर झालेल्या हल्ल्यांनंतर कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ हे शेअर बाजारातील घसरणीमागील सर्वात मोठे कारण होते. तसेच आशियाई बाजारांमधील गोंधळाची स्थिती हेसुद्धा घसरणीचे आणखी एक प्रमुख कारण होते.
Comments are closed.