महाराष्ट्रात आणखी 8 महाविद्यालयांना स्वायत्त दर्जा, एकूण संख्या 68 वर; मुंबई परिसरातील 3 संस्थांचा समावेश

राज्यातील आणखी 8 महाविद्यालयांनी स्वायत्त (Autonomous) दर्जा मिळाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अशा महाविद्यालयांची एकूण संख्या आता 68 वर पोहोचली आहे. नव्याने स्वायत्त दर्जा मिळालेल्या संस्थांमध्ये मुंबई महानगर प्रदेशातील 3 महाविद्यालयांचा समावेश आहे. यामध्ये खार येथील एच. जे. कॉलेज ऑफ एज्युकेशन, माटुंगा येथील बी. एम. एन. कॉलेज ऑफ होम सायन्स आणि पनवेल येथील चांगुकाना ठाकूर कॉलेज यांचा समावेश आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.

या सर्व महाविद्यालयांनी राष्ट्रीय मूल्यांकन आणि मानांकन परिषद (NAAC) मध्ये 3.5 किंवा त्याहून अधिक गुण मिळवले असून त्यांना दोन दिवसांपूर्वी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (UGC) स्वायत्त दर्जा प्रदान करण्यात आला.

या टप्प्यात स्वायत्त दर्जा मिळालेल्या इतर महाविद्यालयांमध्ये पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेज, कराड येथील सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज, पुणे येथील सर परशुरामभाऊ कॉलेज आणि बारामती येथील तुळजाराम चतुर्चंद कॉलेज यांचा समावेश आहे.

स्वायत्त दर्जा मिळालेल्या महाविद्यालयांना ‘RUSA’ अंतर्गत जास्तीत जास्त 5 कोटी रुपयांपर्यंत अतिरिक्त अनुदान मिळण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे हा दर्जा महाविद्यालयांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

RUSA आणि मानव संसाधन विकास मंत्रालयाने निवडक स्वायत्त महाविद्यालयांमध्ये गुणवत्ता आणि उत्कृष्टता वाढवण्यासाठी 70 संस्थांना निधी देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यापैकी सध्या 46 संस्थांना निधी दिला गेला असून अजून 24 संस्थांसाठी जागा उपलब्ध आहे.

माटुंगा येथील जी. एन. खालसा कॉलेज आणि गोरेगाव येथील पाटकर-वर्दे कॉलेज यांना डिसेंबरमध्ये स्वायत्त दर्जा मिळाला होता. पाच वर्षांपूर्वी महाराष्ट्रात केवळ 36 स्वायत्त महाविद्यालये होती. तर तामिळनाडूमध्ये सर्वाधिक 183 स्वायत्त महाविद्यालये आहेत.

एसएनडीटी महिला विद्यापीठाशी संलग्न असलेल्या बी. एम. एन. कॉलेज ऑफ होम सायन्स या महाविद्यालयाने अभ्यासक्रमात बदल करण्याची तयारी सुरू केली आहे. प्राचार्या शिल्पा चरंकर यांनी सांगितले की, उद्योगाच्या गरजेनुसार अभ्यासक्रम सुधारणा, कौशल्य विकासावर भर, मूल्यांकन पद्धतीत बदल, ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करणे आणि इंटर्नशिपचा कालावधी वाढवणे यावर भर दिला जाणार आहे.

पनवेल येथील चांगुकाना ठाकूर कॉलेजमध्ये संशोधनावर विशेष भर दिला जाणार आहे. प्राचार्य वसंत बऱ्हाटे यांनी सांगितले की, अतिरिक्त निधीच्या मदतीने उच्च दर्जाची उपकरणे असलेली प्रयोगशाळा उभारण्याचा आणि पुढे इन्क्युबेशन सेंटर सुरू करण्याचा मानस आहे.

दरम्यान, माटुंगा येथील आर. ए. पोदार कॉलेज, एम. एम. पी. विमेन्स कॉलेज तसेच निर्मला निकेतन इन्स्टिट्यूटचे कॉलेज ऑफ सोशल वर्क यांसह आणखी पाच महाविद्यालये स्वायत्त दर्जासाठी मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.

Comments are closed.