झोमॅटोच्या ऑर्डर्स महाग झाल्या आहेत.

प्लॅटफॉर्म फीमध्ये 19 टक्के वाढ : आता प्रतिऑर्डर 12.50 ऐवजी 14.90 रुपये भाव

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोवरून जेवण मागवणे आता महाग झाले आहे. शुक्रवार, 20 मार्चपासून कंपनीने प्लॅटफॉर्म फीमध्ये 19 टक्के वाढ केली आहे. त्यामुळे प्लॅटफॉर्म फी म्हणून ग्राहकांना आता प्रतिऑर्डर 12.50 रुपयांऐवजी 14.90 रुपये म्हणजेच 2.40 रुपये अधिक मोजावे लागतील. प्लॅटफॉर्म फी हे प्रत्येक फूड ऑर्डरवर आकारले जाणारे एक अतिरिक्त शुल्क असून ते जीएसटी, रेस्टॉरंट शुल्क आणि डिलिव्हरी शुल्कापेक्षा वेगळे असते. झोमॅटो दररोज 20 ते 25 लाख ऑर्डर्सची डिलिव्हरी करत असून त्यांचा व्यवहार कोट्यावधी रुपयांच्या आसपास जातो.

झोमॅटोची मुख्य प्रतिस्पर्धी कंपनी ‘स्विगी’ सध्या करांसहित अंदाजे 14.99 रुपये प्लॅटफॉर्म फी आकारते. कंपनीने सात महिन्यांत दुसऱ्यांदा आपल्या प्लॅटफॉर्म फीमध्ये वाढ केली आहे. यापूर्वीची वाढ सप्टेंबर 2025 मध्ये 20 टक्के होती. ऑगस्ट 2023 मध्ये झोमॅटोने आपला नफा वाढवण्यासाठी आणि लाभ उठवण्यासाठी प्रथमच 2 रुपयांचे प्लॅटफॉर्म शुल्क सुरू केले होते.

 

 

 

Comments are closed.