युद्धाचा फटका, गॅस तुटवड्याचा झटका; बल्लाळेश्वर देवस्थानचे अन्नछत्र बंद

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इराण-इस्त्रायल युद्धाची झळ सर्वसामान्यांना बसत असतानाच त्याचे पडसाद अष्टविनायक तीर्थक्षेत्रातही उमटू लागले आहेत. युद्धामुळे व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद झाल्याने अष्टविनायक गणपतीपैकी प्रसिद्ध पालीच्या बल्लाळेश्वर देवस्थानचे अन्नछत्रही बंद झाले आहे. भाविकांना प्रिय असणारा प्रसादाचा लाडूही मिळणे बंद झाले आहे.

श्री बल्लाळेश्वर गणपतीच्या दर्शनाला दररोज देशभरातून हजारो भाविक येतात. त्यातील दिवसा व रात्री मिळून सरासरी चारशेहून अधिक भाविक देवस्थानच्या अन्नछत्रातही जेवणाचा अत्यल्प दरात लाभ घेतात. एप्रिल आणि मे महिन्यात तर ही संख्या दुप्पट होते. मात्र गॅस मिळणेच बंद झाल्याने हे अन्नछत्र देवस्थान समितीस नाइलाजाने बंद करावे लागले आहे. त्यामुळे भाविकांची प्रचंड गैरसोय होऊ लागली आहे. मंदिर परिसरात असलेल्या आसपासच्या हॉटेलमधील व्यवस्थाही गॅसअभावी कोलमडून गेल्याने जेवणासाठी भाविकांना वणवण करावा लागत आहे.

देवस्थानतर्फे अवघ्या ३० रुपयांत भाविकांना मुबलक भोजन दिले जाते. हा उपक्रम व्यावसायिक नव्हे तर सेवाभावी वृत्तीने चालवला जातो. व्यावसायिक गॅस सिलिंडरचा वापर करून ही व्यवस्था चालवली जाते. आता व्यावसायिक गॅस सिलिंडर पुरवठा बंद झाल्याने नाइलाजाने अन्नछत्रही बंद करावे लागले. शासनाने विशेष बाब म्हणून हा पुरवठा सुरळीत केला तर अन्नछत्रची प्रसाद सेवा आम्ही पुन्हा सुरू करू.

जितेंद्र गद्रे (अध्यक्ष, बल्लाळेश्वर देवस्थान, पाली)

Comments are closed.