VIDEO: धोनीने केली स्वाक्षरी, संजूचा नकार! सीएसकेच्या नव्या स्टारने जिंकले चाहत्यांचे मन, नेमके प्रकरण काय?

भारताचा विकेटकिपर-फलंदाज संजू सॅमसन आयपीएल २०२६ च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणार आहे. त्याने अजून एक सामनाही नाही खेळला आणि चाहत्यांनी त्याचे कौतुक केले आहे. नेमके काय झाले ते जाणून घेऊ. संजूने चेन्नईच्या कॅम्पमध्ये सरावाला सुरूवात केली आहे. त्यामध्ये तो शक्य तितका वेळ भारताचा आणि चेन्नईचा माजी कर्णधार एमएस धोनीसोबत व्यतित करत आहे. यामध्ये तो धोनीसोबत सरावाबरोबरच क्रिकेटच्या चर्चा आणि त्याच्याकडून काही नवीन शिकत आहे. तसेच तो अनेक कार्यक्रमांमध्येही धोनीसोबत दिसत असून अशाच एका क्षणी त्याचा साधेपणा पुन्हा एकदा दिसला आहे.
त्या कार्यक्रमामध्ये आयोजकांनी धोनीला बॅटवर साईन (स्वाक्षरी) करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी सॅमसनलाही साईन करण्याची विनंती केली, मात्र त्याने नम्रपणे त्याला नकार दिला आणि तो क्षण धोनीपुरताच मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेतला. अखेर धोनीनेच त्याला साईन करण्यास भाग पाडले. या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
सॅमसनने आयपीएलआधी भारताकडून आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ च्या स्पर्धेत मोठी कामगिरी केली. त्याने त्या स्पर्धेत केवळ ५ सामने खेळताना संघाच्या विजयांमध्ये महत्वाची भुमिका पार पाडली. तो आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून ट्रेड होत चेन्नईमध्ये आला आहे. यामुळे आता विश्वचषकानंतर आयपीएलमध्येही चांगली कामगिरी करण्यासाठी तो सज्ज झाला आहे.
धोनीसोबत ड्रेसिंग रुम शेयर करण्याबाबत सॅमसन म्हणाला, “मी माही भाईसोबत फोनवर बोललो आहे, त्यांच्याशी संवाद साधला असून त्यांच्यासोबत एक संघ म्हणून खेळणे उत्तम ठरेल. मी याकडे त्यांच्याकडून काहीतरी नवीन शिकण्याची संधी म्हणून पाहतो.”
आयपीएल २०२६ च्या पहिल्याच सामन्यात सॅमसन आपल्या आधीच्या संघासोबत दोन हात करणार आहे. ३० मार्चला चेन्नईचा पहिला सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध असणार आहे. हा सामना गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
या सामन्याबाबत सॅमसन म्हणाला, “मी राजस्थानविरुद्ध पहिल्यांदाच खेळणार असून मैदानावर मी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवणार आहे. संघातील माझा काळ संपल्याने मी राजस्थान रॉयल्स सोडण्याचा निर्णय घेतला होता. आता त्यांच्याविरुद्ध सामना असल्याने मी माझा सर्वोत्तम खेळ खेळणार.”
टी२० विश्वचषकात सॅमसनने ५ सामन्यात ३२१ धावा केल्या आणि त्याने ‘प्लेयर ऑफ द टुर्नामेंट’चा पुरस्कारही जिंकला.
Comments are closed.