लक्ष्मी ऑरगॅनिक धोकादायक! लोटेतील लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधात 11 ग्रामपंचायतींनी दंड थोपटले
लोटेतील लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधात परिसरातील आंबडस, लोटे, धामणदेवी, घाणेखुंट, शेल्डी, सोनगाव, भेलसई, आवाशी, कालुस्ते, शेल्डी व गुणदे या अकरा ग्रामपंचायतींनी लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीच्या विरोधात ठराव केले आहेत. या सर्व ग्रामपंचायतीच्या वतीने नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.
तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील लक्ष्मी ऑरगॅनिक केमिकल कंपनी मानवाला व जीवसृष्टीला घातक अशा पीफास रसायन उत्पादन करीत आहे. अशा उत्पादन करणा-या रसायनावर बंदी घालावी या मागणीसाठी पर्यावरणवाद्यांचे कंपनीसमोर दोन महिने उपोषण देखील सुरू आहे. त्यातच अकरा ग्रामपंचायतींनी देखील लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधात ठराव मंजूर करून त्यांच्या प्रती बुधवार 18 मार्च रोजी जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांना स्थानिक ग्रामपंचायतींच्या ठरावांसह निवेदन देण्यात आले. त्यामुळे लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक केमिकल लिमिटेड या वादग्रस्त कारखान्याच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून परिसरातील अकरा ग्रामपंचायतींनी ग्रामसभांमधून कंपनी बंद करण्याचा ठराव एकमुखाने मंजूर केल्याने आंदोलनाला अधिक धार प्राप्त झाली आहे. जनतेच्या हितासाठी व जनतेच्या न्यायासाठी आम्ही सर्व ग्रामपंचायती एकत्र येऊन कंपनी बंद पडेपर्यंत लढा देणार, अशी ग्वाही सुद्धा एकत्रित देण्यात आली आहे.
लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनी विरोधात जिल्हाधिकारी व अप्पर जिल्हा अधिक्षकांची लोटेतील उद्योजकांनी 18 मार्च रोजी भेट घेतली, त्यावेळी उद्योजक संजय महादेव आंब्रे, संजय गणपत साळवे, रवींद्र गोवळकर, अविनाश जी आंब्रे, किशोर हरिश्चंद्र आंब्रे, संजय राम आंब्रे, उदय घाग, सुबोध सावंतदेसाई यांनी आपली आंदोलनाची पुढील भूमिका काय असेल, यासंदर्भात चर्चा केली व जोपर्यंत कंपनी बंद होणार नाही. तोपर्यंत हे जनआंदोलन संविधानिक पद्धतीने, लोकशाहीच्या मार्गाने आम्ही चालूच ठेवणार, अशी भूमिका स्पष्ट केली.
Comments are closed.