सलग तीन वेळा शून्यावर बाद झाल्यावर अभिषेक शर्माचा शुबमन गिलला मेसेज, स्वतःच केला खुलासा!

सूर्यकुमार यादवच्या Suryakumar Yadav under captaincy) नेतृत्वाखाली भारतीय संघाने 8 मार्च रोजी झालेल्या टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या फायनलमध्ये न्यूझीलंडचा पराभव केला आणि तिसऱ्यांदा या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. या स्पर्धेत टीम इंडियाच्या काही खेळाडूंच्या कामगिरीत चढ-उतार पाहायला मिळाले, ज्यामध्ये सलामीवीर अभिषेक शर्माचेही (Abhishek Sharma) नाव आहे. या स्पर्धेत अभिषेकची बॅट तळपेल अशी सर्वांना अपेक्षा होती, पण सलग तीन सामन्यांत त्याला आपले खातेही उघडता आले नव्हते. त्यानंतर अभिषेकवर मोठी टीकाही झाली. मात्र, नंतर अभिषेक शर्माने शानदार पुनरागमन केले आणि फायनलमध्ये धडाकेबाज अर्धशतकी खेळी करून टीम इंडियाला विजेता बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
आता अभिषेक शर्माने खुलासा केला आहे की, जेव्हा तो सलग तीन वेळा शून्यावर बाद झाला, तेव्हा त्याने शुबमन गिलला (Shubman gill) मेसेज केला होता.
15 मार्च रोजी बीसीसीआयतर्फे दिल्लीत ‘नमन अवॉर्ड्स’चे आयोजन करण्यात आले होते, जिथे टीम इंडियाचे सर्व खेळाडू उपस्थित होते. या सोहळ्यात जेव्हा शुबमन गिलला विचारण्यात आले की, टी-20 वर्ल्ड कप सुरू होण्यापूर्वी त्याने अभिषेकला काही सल्ला दिला होता का? यावर गिल म्हणाला की, नंबर-1 टी-20 फलंदाजाला कोण सल्ला देऊ शकतं? यानंतर अभिषेकने पुढे सांगितले की, स्पर्धेच्या सुरुवातीला सलग तीन वेळा शून्यावर बाद झाल्यावर मीच गिलला मेसेज केला होता. मी त्याला म्हणालो होतो की, दुसरा कोणताही (नको असलेला) रेकॉर्ड बनण्यापूर्वी मला तुझी बॅट दे.
अभिषेक शर्माने पुढे सांगितले की, शुबमन गिलने यावर उत्तर दिले होते की, तू करून दाखवशील, काळजी नको. जेव्हा अभिषेकला विचारण्यात आले की त्याला कोणाच्या बॅटने खेळायला सर्वात जास्त आवडते, तेव्हा त्याने शुबमन गिलचे नाव घेतले. यावर गिलने हसत सांगितले की, तो नेहमी माझ्याच बॅटने खेळतो. शुबमन गिल आणि अभिषेक शर्मा हे बालपणीचे मित्र असून घरगुती क्रिकेटमध्ये दोघेही पंजाबकडून खेळतात.
Comments are closed.