Kokan News – नागावेत प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग; सुदैवाने सहा कामगार बचावले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

चिपळूण तालुक्यातील नागावे नदीपात्रालगत असलेल्या भंगार प्लास्टिकचा साठा असलेल्या गोदामाला अचानक लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण इमारत भस्मसात झाली. या इमारतीत काम करत असलेल्या सहा कामगारांनी प्रसंगावधान राखत वेळीच बाहेर पडून आपला जीव वाचवला. ही घटना सायंकाळी साधारण 4 वाजताच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, पालांडे नामक एका व्यवसायिकाची नागावे येथे डबर-खडी क्रशर होती. ती बंद पडल्यानंतर ती जागा त्यांनी एका भंगार व्यवसायिकाला भाडेतत्वावर दिली होती. संबंधित ठिकाणी भंगार प्लास्टिक पिशव्या धुवून व सुकवून त्यापासून कच्चा माल तयार करण्याची प्रक्रिया सुरू होती. सुमारे तीन ट्रक इतका मोठा प्लास्टिक साठा येथे होता. दरम्यान, इमारतीलगत वाढलेले गवत शेतीकामासाठी पेटवण्यात आले होते. कडक उन्हामुळे ही आग वेगाने पसरत जाऊन प्लास्टिक साठ्यापर्यंत पोहोचल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळेच ही आग वणव्यामुळे लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आग लागल्यानंतर जवळपास अर्धा तास उलटून गेला तरी पोलीस व अग्निशमन यंत्रणेला वेळेत कळवण्यात विलंब झाल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. नंतर महाजनको पोफळी येथून अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला; मात्र त्यांच्याकडील पाणीसाठा अपुरा पडल्याने आग विझवण्याच्या कामात अडथळे निर्माण झाले. पाठोपाठ चिपळूण नगर पालिकेचा अग्निशमन बंबही दाखल झाला असून आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु झाले. दरम्यान, आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की काही वेळातच संपूर्ण इमारत जळून खाक झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.या घटनेची पुढील चौकशी सुरू असून, आगीचे नेमके कारण शोधण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Comments are closed.