रत्नागिरीतील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात रॅगिंगचा प्रकार; पोलीस अधीक्षकांचे समुपदेशनाचे आदेश

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रत्नागिरीतील लोकनेते शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘कॉमन ऑफ’ घेण्यासाठी ८ विद्यार्थ्यांनी इतर ३ विद्यार्थ्यांना मानसिक त्रास देऊन त्यांचे रॅगिंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तीन पीडित विद्यार्थ्यांनी या त्रासाबाबत शिक्षकांकडे दाद मागितली. त्यांच्या तक्रारीनुसार, त्याच विभागातील ८ विद्यार्थ्यांनी संगनमत करून ‘कॉमन ऑफ’ (सुट्टी) घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला. हे विद्यार्थी केवळ मनमानी करत नाहीत, तर वारंवार शिवीगाळ, धमक्या देणे आणि वाद घालणे असे प्रकार करत असल्याचे समोर आले आहे. या सततच्या मानसिक त्रासामुळे आपण प्रचंड तणावाखाली असून सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे पीडित विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि शहर पोलीस ठाण्यात लेखी निवेदन दिले आहे.

या प्रकरणाबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्पष्ट केले की, “रॅगिंगच्या या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे. पीडित विद्यार्थ्यांनी रीतसर पोलीस फिर्याद दिल्यास दोषींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच, भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्याचे निर्देश दिले आहेत.”

Comments are closed.