अभिषेक शर्माचा बॅटने धुमाकूळ! सराव सामन्यात ठोकल्या 94 धावा, ईशान किशनचीही वादळी खेळी

भारतीय संघाचा स्टार फलंदाज अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) आयपीएल 2026 पूर्वी जबरदस्त फॉर्ममध्ये परतला आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाने आपापसात एक सराव सामना (Intra-squad match) खेळला. 28 मार्चपासून सुरू होणाऱ्या हंगामासाठी हैदराबादचे खेळाडू कसून सराव करत आहेत.
या सराव सामन्यात अभिषेक शर्माने गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याने केवळ 27 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. 50 धावा झाल्यानंतर त्याने अधिक आक्रमक पवित्रा घेतला आणि चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. वेगवान गोलंदाज असो वा फिरकीपटू, अभिषेकने कोणालाही सेट होऊ दिले नाही. अखेर तो 42 चेंडूत 94 धावा करून बाद झाला. इंग्लंडच्या ब्रायडन कार्सने त्याला बाद केले.
ईशान किशन आणि अभिषेक शर्मा यांनी डावाची सुरुवात केली होती. मात्र, पहिल्या डावात ईशानला खास कामगिरी करता आली नाही, तो 14 चेंडूत 18 धावा करून बाद झाला. पण, दुसऱ्या डावात फलंदाजीची संधी मिळताच ईशानने आपले जुने रूप दाखवले आणि केवळ 25 चेंडूत 72 धावा केल्या.
अभिषेक आणि ईशानच्या फटकेबाजीमुळे SRH ‘ए’ संघाने 20 षटकांत 9 गडी गमावून 253 धावांचा डोंगर उभा केला. यंदाच्या हंगामात अत्यंत घातक दिसत आहे. त्यांच्याकडे अभिषेक शर्मा, ईशान किशन, ट्रॅव्हिस हेड आणि हेनरिक क्लासेन यांसारखे स्फोटक फलंदाज आहेत, जे कोणत्याही गोलंदाजीसमोर 250 हून अधिक धावा बनवू शकतात. विशेष म्हणजे, अभिषेक आणि ईशानने अलीकडेच भारतीय संघाच्या वर्ल्ड कप विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता आयपीएलमध्ये ते कशी कामगिरी करतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Comments are closed.