खरात फाइल्समध्ये अडकलेले ते मंत्री कोण? खुलासे, स्पष्टीकरण आणि सारवासारव

राजकीय नेत्यांचा बहुचर्चित ज्योतिषी भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याच्या कारनाम्यांची फाइल्स उघडताच महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. महायुती सरकारमधील अर्धा डझनहून अधिक मंत्री खरात फाइल्समध्ये अडकल्याचे सांगितले जात असून, ते मंत्री कोण याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. या प्रकरणात राजकीय बळी जाण्याच्या भीतीने काही आजी-माजी मंत्र्यांकडून खुलासे, स्पष्टीकरण आणि सारवासारव सुरू झाली आहे.

नाशिकमधील एका महिलेने केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीमुळे  झालेल्या अटकेनंतर भोंदूबाबा कॅप्टन खरात याचे कारनामे उघडकीस येऊ लागले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात थेट एसआयटी नेमून चौकशीचे आदेश दिल्याने खरातशी संबंध असणाऱ्या सर्वांचेच धाबे दणाणले आहे. खरातसोबत काही आजी-माजी मंत्र्यांची छायाचित्रे आणि व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले असून, खरातशी कुणाचे नेमके काय संबंध आहेत याबाबत तर्कवितर्क वर्तविले जात आहेत. खरात फाइल्सबाबत संबंधितांकडे संशयाने पाहिले जात आहे.

खरात यांच्या सोबतच्या फोटोमुळे काही मंत्र्यांकडे संशयाने पाहिले जात असून, जलसंपदा मंत्री राधा कृष्ण विखे पाटील म्हणाले, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना एकदा शिर्डीला आले होते. त्यावेळी त्यांनी खरात याच्या मंदिरात जायचे असल्याचे सांगितले. त्यावेळी मी पालकमंत्री या नात्याने त्यांच्या स्वागताला त्यांच्यासोबत होतो. शिंदे पूजा करायला आत गेले आणि मी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बाहेर थांबलो होतो, अशी सारवासारव विखे-पाटील यांनी भोंदूबाबा खरात प्रकरणात केली आहे.

मंदिरामुळे माझी आणि खरातची ओळख – केसरकर

ईशानेश्वर मंदिरामुळे माझी आणि अशोक खरातची ओळख झाली ही वस्तुस्थिती आहे. मी स्वतः देवभक्त असल्यामुळे एकदा शिर्डीला जात असताना सिन्नरमध्ये हे ईशानेश्वर मंदिर असल्यामुळे कधीतरी त्या ठिकाणी जाणे होत होते. खरात याच्याशी बाकी काही माझा तसा संबंध नाही, असा खुलासा शिंदे गटाचे नेते, माजी मंत्री दीपक केसरकर यांनी खरातसोबतच्या व्हायरल फोटोवरून होत असलेल्या आरोपाबाबत केला.

चंद्रकांत पाटील यांचे खरातशी काय संबंध? – धंगेकर

भोंदूबाबा अशोक खरातसोबत भाजपचे नेते आणि उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचेही पह्टोही उघड झाले आहेत. पाटील यांनी पुण्याला काळिमा फासण्याचे काम केले आहे. त्यांचे फोटो पाहिले तर खरात कोणी तरी मोठा माणूस आहे आणि पाटील हात आणि खांदे खाली करून उभे आहेत. जणू पाटील काही विधी करत आहेत असा संशय येतो. पाटील यांचे खरातशी काय संबंध?  यासंदर्भात खुलासा करणे गरजेचे आहे, असे शिवसेना नेते रवींद्र धंगेकर म्हणाले.

अटकेआधी खरातची तीन सनदी अधिकाऱ्यांशी भेट

भोंदूबाबा अशोक खरातने अटकेची चाहूल लागताच शिर्डीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्याची तीन सनदी अधिकाऱ्यांशी भेट झाली होती.  हे अधिकारी कोण? व त्या बैठकीत काय चर्चा झाली? असे विविध प्रश्न याप्रकरणी उपस्थित होत आहेत. ही भेट विनोद नामक व्यक्तीने घडवून आणली होती. हा विनोद नामक व्यक्ती अशोक खरातचा शिर्डी परिसरातील पंटर असल्याची माहिती समोर येत आहे.

आजी-माजी मंत्री टेन्शनमध्ये

भोंदूबाबा खरातसोबतच्या जवळिकीमुळे रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली. हाच न्याय खरातसोबत जवळीक असणाऱ्या इतर नेत्यांनाही लावण्याची मागणी होत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, चंद्रकांत पाटील, माजी मंत्री दीपक केसरकर यांच्यासह काही आजी-माजी मंत्र्यांचे टेन्शन वाढले आहे.

फडणवीसांच्या कार्यक्रमांना शिंदे अनुपस्थित

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याला भेटायला अनेक राजकीय नेते मंडळी येत होती. खरातसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही सलगी असल्याची छायाचित्रे समोर आली आहेत. खरात प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडवर येताच शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या सलग दोन सरकारी कार्यक्रमांना दांडी मारली. शुक्रवारी महाड येथील चवदार तळय़ाच्या कार्यक्रमाला आणि आज लोकभवनातील दीक्षान्त सोहळय़ाला शिंदे अनुपस्थित होते. त्यामुळे विविध प्रकारच्या चर्चांना पेव फुटले आहे.

Comments are closed.