फिरस्ती – सोनेरी दुर्ग होन्नुरगड

>> प्रांजल वाघ, [email protected]

रणरणत्या उन्हात काळ्याभोर डांबरी रस्त्यावरून आमची गाडी पुण्याहून हुक्केरी ओलांडून एक अपरिचित आणि विस्मरणात गेलेला दुर्ग पाहण्यासाठी धावत होती. गोकाक रस्त्यावर राजा लखमगौडा सरोवर म्हणजेच हिडकल धरणाच्या रोखाने जात असता एक छोटी टेकडी आपल्या नजरेस पडते. या टेकडीला स्थानिक पवित्र डोंगर म्हणतात. एका विशिष्ट दिशेने पाहिल्यास हा डोंगर पैजारासारखा म्हणजेच मोजडीसारखा दिसतो म्हणून याला पैजार डोंगरदेखील म्हटले जाते, पण या डोंगरावर छत्रपती शिवरायांच्या दुर्गस्थापत्याची स्मृती तेवत उभा असलेला एक दुर्ग आहे. जांभया खडकात बांधलेला आणि 14 बुरुजांनी नटलेल्या या दुर्गाचे नाव होन्नुर दुर्ग.

हिडकल सरोवर अस्तित्वात येण्यापूर्वी या प्रदेशाचा भूगोल वेगळा होता. जवळच असलेलं बेळगाव आणि घटप्रभा नदीच्या खोऱयावर करडी नजर ठेवण्यासाठी या परिसरात अनेक दुर्ग व ठाणी बांधली गेली. हर्गापूरचा वल्लभगड, यमकनमर्डीचा भुईकोट, पाच्छापूरचा भव्य किल्ला आणि होन्नुरगड हे किल्ले यासाठीच बांधले गेले असावेत. सध्या महाराष्ट्रात असलेले सामानगड, महिपाल्गड, गंधर्वगड आणि बेळगाव यामधील व्यापारी वाहतुकीचे संरक्षण व सैन्याच्या रसदेचा मार्ग सुरक्षित करणे यासाठीही हे किल्ले वापरले जात असतील.

होन्नुरगड कोणी बांधला हे आपल्याला ज्ञात नाही. कन्नडामध्ये `होन्नु’ म्हणजे `सोनं’ आणि `उरू’ म्हणजे `गाव’ – सोन्याचं गाव म्हणजे होन्नुरू. बेळगावचा किल्ला बांधणाऱया रट्ट राजांनी कदाचित होन्नुरूला हे ठाण बांधलं असेल. पुढे गोव्याच्या कदंब राजांकडे हा प्रदेश गेला आणि नंतर विजापूरच्या (विजयपुरा) आदिलशाहीकडे.

स्थानिक लोकांचे असे मानणे आहे की, छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा दक्षिण दिग्विजय मोहिमेवर निघाले तेव्हा त्यांच्या नजरेस हा डोंगर पडला आणि त्यांनी याचे सामरिक महत्त्व जाणून इथे भक्कम असा जांभया खडकातील दुर्ग बांधून घेतला. गडाच्या पूर्वेस असलेला मराठा शैलीतला गोमुखी दरवाजा कदाचित याचीच साक्ष देत उभा आहे. शिवरायांची नजर पडताच या डोंगराच्या अस्तित्वाचे सोने झाले. होन्नुरगड आपल्या नावाला जगला.

या भग्न द्वारातून गडात प्रवेश करताच पहारेकऱयांसाठी बांधलेल्या कमानदार देवडय़ा नजरेस पडतात. गडाच्या आत वाडय़ांच्या अथवा घरटय़ांच्या बांधकामाचे काही अवशेष आपल्या नजरेस पडतात. किल्ल्याच्या मध्यभागी एक 50 फूट खोल विहीर आहे, पण उन्हाळ्यात इथे पाण्याचा थेंबदेखील नसतो. किल्ल्याच्या पश्चिमेस हिडकल सरोवराकडे तोंड करून उभा आहे किल्ल्याचा निशाणी बुरुज – किल्ल्यातील सर्वोच्च स्थान. इथूनच पश्चिमेकडे उतरणारा किल्ल्याचा उद्ध्वस्त दरवाजा आढळून येतो.
निशाण बुरुजावर चढून पाहता हिडकल सरोवराचा नयनरम्य नजारा दृष्टीस पडतो. सरोवराच्या पाण्याखाली एक प्राचीन विठ्ठल मंदिर गेले आहे. उन्हाळ्यात पाणी ओसरल्यावर ते दृष्टीस पडते. पूर्वेकडे हिडकल धरण आणि किल्ल्याच्या पायथ्याला दक्षिणेस सध्याचे सर्किट हाऊस आहे.

1818 मध्ये मराठेशाही खालसा झाल्यावर इथले भगवे निशाण हटले, पण 1844 ब्रिटिशांनी सामानगड परिसरातल्या गडकऱयांचे बंड मोडून काढण्यासाठी जनरल डेलामोटच्या नेतृत्वाखाली या परिसरात सैन्य पाठवले. तेव्हा होन्नुरवर त्यांची काळी नजर फिरली आणि त्यांनी किल्ल्याचा विध्वंस केला. 1853 च्या नोंदीत होन्नुरगड भग्नावस्थेत असल्याच्या नोंदी ब्रिटिश दरबारी सापडतात.

हिडकल सरोवरावर मावळणाऱया सूर्याच्या सोनेरी किरणात इथला चिरा अन् चिरा चमकून उठतो आणि होन्नुरगड खरोखर सोनेरी दुर्ग दिसू लागतो. शिवछत्रपतींच्या दुर्गस्थापत्याचा आविष्कार डोळे भरून पाहण्यासाठी आणि त्यांच्या दक्षिणेतल्या पाऊलखुणा अनुभवण्यासाठी होन्नुरगडाला आवर्जून भेट दिली पाहिजे.

Comments are closed.