बोलीची समृद्धता – सामवेदी बोली

>> वर्णिका काकडे

सामवेदी बोली ही महाराष्ट्राच्या वसई उत्तर भागात,साधारण सहाव्या शतकापासून बोलली जाते. सामवेदी ब्राह्मण, पाचकळशे व सामवेदी ख्रिस्ती लोकांमध्ये ही भाषा बोलली जाते. ही भाषा मुख्यत्वे मराठी कोकणी आणि गुजराती भाषेशी मेळ खाते. या बोलीस कादोडीबोली असेही म्हणतात. आजमितीला साधारण 50,000 लोक ही बोलीभाषा बोलतात.
वसई जिह्यातील मुख्यत्वे 1)भुईगाव, 2)वाघोली, 3)कोफराड, 4 गास, 5) उमराळे, 6) बोळींज, 7)गावधनी, 8)वटार, 9)वाळून्जे, 10)वंडा( मर्देस ) 11)पढाई 12)करमाळे, 13) नावळे, 14) सोमाडी, 15) बानकर, 16) मांडपे, या गावांमध्ये ही सामवेदी बोली बोलली जाते.

सामवेदी बोली मराठी, कोकणी आणि पोर्तुगीज शब्दांचे एक सुंदर मिश्रण आहे. यात गुजराती भाषेचाही थोडा प्रभाव दिसून येतो. ‘कादोडी’ नावाने ओळखली जाणारी ही बोली तिच्या विशिष्ट उच्चारांमुळे आणि शब्दसंग्रहामुळे इतर मराठी बोलींपेक्षा वेगळी ठरते. सामवेदी भाषेत समृद्ध लोकसाहित्य आहे, ज्यात लोकगीते, म्हणी आणि कथांचा समावेश होतो. ही बोली वसईच्या स्थानिक भूमीपुत्रांची, शेतकऱयांची आणि कोळी बांधवांची संस्कृती जपणारी आहे.

ठाणे जिह्यातील वसई तालुक्यात उत्तरेकडच्या किनारपट्टीतील आगाशीपासून भुईगावपर्यंतच्या बारा गावांत वसलेला समाज म्हणजे सामवेदी समाज. ताडामाडाने वेढलेल्या, हिरव्यागार वृक्षलतांनी डवरलेल्या, मोगरा, जाई, जुई अन् काकडा या फुलांनी सुगंधित झालेल्या, पश्चिमेला अरबी सागराची किनार लाभलेल्या या बारा गावांना एकाच बोलीभाषेने गुंफलेलं आहे, ती भाषा म्हणजे सामवेदी बोलीभाषा होय. जिला स्थानिक लोक ‘कादोडी’ या नावाने पुकारतात. गाणारा समाज म्हणून ओळख असलेल्या सामवेदी समाजाची बोली हेल लावून विशिष्ट सुरात बोलली जाते. या भाषेला लय आहे.

या बोलीवर ‘डॉ. नरेश नाईक’ यांनी विस्तृत संशोधन केले आहे, ज्यातून तिची व्याकरणाची रचना समजण्यास मदत होते. नंदाखाल गावातील एक शिक्षक पॉल रुमाव यांनी ‘सामवेदी लोकगीते’, ‘मधाच्या घागरी’, ‘सामवेदी ख्रिस्ती समाज’, ‘वसई परिसरातील म्हणी’ इत्यादी सामवेदी बोली संदर्भातील ग्रंथांचे संपादन केले आहे.

Comments are closed.