Iran Israel War – इराणचा इस्रायलवर भीषण क्षेपणास्त्र हल्ला; अराद आणि दिमोना शहरांना लक्ष्य केल्याने 100 हून अधिक जखमी
इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाने शनिवारी संध्याकाळी अत्यंत हिंसक वळण घेतले. इराणने दक्षिण इस्रायलमधील अराद आणि दिमोना या शहरांवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा जोरदार वर्षाव केला. या हल्ल्यात मुलांसह 100 हून अधिक नागरिक जखमी झाले असून अनेक इमारतींचे प्रचंड नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, इराणने या हल्ल्यात इस्रायलचे मुख्य अणुसंशोधन केंद्र असलेल्या दिमोना येथील ‘शिमोन पेरेस नेगेव्ह’ केंद्राला आपले प्राथमिक लक्ष्य बनवले होते.
इस्रायली लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची संरक्षण यंत्रणा ही क्षेपणास्त्रे रोखण्यात अपयशी ठरली, ज्यामुळे जमिनीवर मोठी हानी झाली आहे. अराद शहरातील एका निवासी भागावर थेट क्षेपणास्त्र आदळल्याने परिसरात हाहाकार माजला. मागेन डेव्हिड अडोम या आपत्कालीन सेवेने दिलेल्या माहितीनुसार, जखमींमध्ये 5 वर्षांची चिमुरडी आणि 12 वर्षांच्या मुलाचा समावेश असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. स्फोटांमुळे अनेक इमारतींच्या भिंती कोसळल्या असून सार्वजनिक वाहतुकीच्या बसच्या काचा फुटल्या आहेत. अनेक लोक अजूनही बेपत्ता असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांच्या शोधासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अरादच्या महापौरांशी चर्चा करून जखमींच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली.
दुसरीकडे, इराणमध्येही युद्धाची दाहकता वाढत असून तेथील मृतांचा आकडा 1 हजार 500 च्या वर गेल्याचे इराणच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. तेहरानमध्येही मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. याच दरम्यान इराणने इराकची राजधानी बगदादवरही ड्रोन हल्ला केला आहे. बगदाद विमानतळाजवळ आणि इराकी राष्ट्रीय गुप्तचर सेवेच्या (INIS) मुख्यालयावर झालेल्या या हल्ल्यात एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. पश्चिम आशियातील या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने कडक पावले उचलली आहेत. बगदादमधील अमेरिकी दूतावासाने आपल्या नागरिकांना तातडीने इराक सोडण्याचा इशारा दिला आहे. इराण समर्थित गटांकडून अमेरिकेशी संबंधित संस्था, कंपन्यांना लक्ष्य केले जात असल्याने सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या संपूर्ण संकटामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे ढग गडद झाले असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
Comments are closed.