तू मरत का नाहीस? IPL अर्ध्यावरच थांबवावं लागल्यानं वर्ल्डकप विजेत्यावर पडलेली ट्रोलधाड, स्वत: केला धक्कादायक खुलासा

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानात झालेल्या अंतिम लढतीत न्यूझीलंडचा दारूण पराभव करत हिंदुस्थानने आयसीसी टी-20 वर्ल्डकप जिंकला. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने हा वर्ल्डकप जिंकला. विशेष म्हणजे हिंदुस्थानने सलग दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्डकप जिंकण्याचा कारनामा केला. हिंदुस्थानच्या विश्वविजयामध्ये फिरकीपटू वरुण चक्रवर्ती यानेही मोलाचा वाटा उचलला. वर्ल्डकप संपल्यानंतर आता वरुणला आयपीएलचे वेध लागले असून तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळणार आहे. आयपीएल सुरू होण्याआधी वरुणने एक अत्यंत वाईट अनुभव सांगितला आहे. 2021 च्या आयपीएल हंगामात कोविड पॉझिटिव्ह आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याच्यावर टोकाची टीका केली होती.

इंडियन प्रीमियर लीग 2021 च्या बायो-बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यामुळे बीसीसीआयने ही स्पर्धा अर्ध्यावरच थांबवण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी वरुण चक्रवर्ती हा कोविड पॉझिटिव्ह आढळलेला पहिला खेळाडू ठरला होता. वरुण खांद्याच्या दुखापतीच्या स्कॅनिंगसाठी अधिकृत ‘ग्रीन चॅनल’द्वारे बायो-बबलमधून बाहेर गेला होता, तिथेच त्याला संसर्ग झाला असावा असा अंदाज होता. वरुणसोबतच संदीप वॉरियरलाही कोरोना झाला होता. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघातील सामना पुढे ढकलावा लागला आणि त्यानंतर संपूर्ण स्पर्धाच थांबवण्यात आली.

साहिबा बालीच्या ‘जर्नी टू जर्सी’ या यूट्यूब शोमध्ये बोलताना वरुणने त्यावेळी पडलेल्या ट्रोलधाडीबाबत सांगितले आहे. 2021 मध्ये जेव्हा माझ्यामुळे आयपीएल थांबले, तो काळ माझ्यासाठी सर्वात वाईट होता. मी पॉझिटिव्ह आलेला पहिला व्यक्ती होतो. त्यावेळी लॉकडाऊनमध्ये लोकांकडे मनोरंजनासाठी फक्त आयपीएल हेच साधन होते. स्पर्धा थांबल्यामुळे लोक इतके संतापले होते की त्यांनी मला शिवीगाळ करायला सुरुवात केली. काही लोकांनी तर ‘तू मरत का नाहीस? इथपर्यंत मेसेज केले होते, असा धक्कादायक खुलासा वरुणने केला.

IPL 2026 – 55 चेंडूंमध्येच खुर्दा उडवला; सामना हातातून निसटलेलाच… पण 21 वर्षाच्या पोरानं चित्र बदललं

दरम्यान, वरुणनंतर चेन्नई सुपर किंग्सचे गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि सीईओ काशी विश्वनाथन यांनाही कोरोनाची लागण झाली होती. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून बीसीसीआयने स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित केली. पुढे 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर 2021 या काळात युएईध्ये या स्पर्धेचे उरलेले सामने खेळवण्यात आले होते.

वरुणची आयपीएलमधील कामगिरी

वरुण चक्रवर्ती आतापर्यंत आयपीएलमध्ये 84 सामने खेळला आहे. यापैकी 83 सामन्यात गोलंदाजी करताना त्याने 100 विकेट्स घेतल्या आहेत. 20 धावांवर 5 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. तर 13 डावात फलंदाजी करताना त्याने 26 धावा केल्या आहेत.

IPL 2026 – केकेआरचं टेन्शन वाढलं; हर्षित राणानंतर डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज जखमी, संपूर्ण स्पर्धेला मुकणार

Comments are closed.