पतीला केबिनबाहेर बसवून गर्भवतीवर अत्याचार! भोंदूबाबा खरातची विकृती, आणखी तीन महिलांची एसआयटीकडे तक्रार

भोंदूबाबा अशोक खरातच्या अनेक विकृती दिवसेंदिवस समोर येत आहेत. पतीला केबिनबाहेर बसवून त्याने पूजाविधीच्या नावाखाली गर्भवती महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. आणखी तीन महिला पुढे आल्या असून एसआयटीसमोर त्यांनी आपल्यावरील अत्याचाराच्या कहाण्या कथन केल्या आहेत. यातील एक महिला अहिल्यानगर जिह्यातील आहे.

अंकशास्त्र, विश्वशास्त्राच्या नावाखाली खरातने नाशिकच्या कॅनडा कॉर्नर भागात उघडलेले भविष्य सांगण्याचे ‘दुकान’ हा महिलांवरील अत्याचारांचा अड्डाच होता, असे स्पष्ट होत आहे. पतीला ठार मारण्याची धमकी देऊन वेळोवेळी बलात्कार केल्याची तक्रार एका महिलेने 17 मार्च रोजी दिली आणि त्याच्या वासनाकांडाचे बिंग फुटले. सरकारने या गुह्याच्या तपासासाठी विशेष तपास पथक नेमले आहे. पथकाच्या प्रमुख आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांनी चौकशीला वेग दिला आहे. खरातचे काळे कारनामे उघड होत असल्याने त्याच्यावर कारवाई होऊ शकते, असा विश्वास पीडित महिलांमध्ये वाढला आहे. त्यामुळे त्या तक्रार देण्यासाठी पुढे येत आहेत. शनिवारी रात्री एका महिलेने सरकारवाडा पोलिसांत धाव घेतली, खरातने केलेले अत्याचार पोलिसांना सांगितले. होणारे अपत्य सुदृढ व निरोगी राहावे, संस्कारी होऊन जन्मानंतर भविष्य उज्ज्वल व्हावे, यासाठी पूजाविधी करावा लागेल, अशी बतावणी त्याने केली. पती-पत्नीला कॅनडा कॉर्नरच्या कार्यालयात बोलवून मन वळविले. पत्नीला एकटीलाच पूजाविधी करावा लागेल, तू बाहेर थांब, असे सांगून पतीला बाहेर बसविले. पोटातील बाळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि रक्षणासाठी माझा आशीर्वाद हवा आहे, मला प्रसन्न करण्यासाठी मला विरोध करू नको, असे सांगून त्याने या गर्भवती महिलेवर बलात्कार केला. पती व बाळाच्या सुरक्षेसाठी मी तेव्हा तक्रार दिली नाही, असे या महिलेने पोलिसांना सांगितले. तिच्या तक्रारीवरून आता खरातविरुद्ध बलात्काराचा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. अहिल्यानगर जिह्यातील एक व नाशिकमधील दोन अशा आणखी तीन महिला तपासी पथकासमोर तक्रार देण्यासाठी हजर झाल्या आहेत. त्याबाबत कारवाई सुरू आहे. एकूण पाच महिलांवर अत्याचार केल्याचे उघड झाले आहे.

पत्रकार व प्रसार माध्यमांना टाळण्यासाठी विशेष तपास पथकाने आता खरातच्या चौकशीकरिता पोलीस अॅकॅडमीचे ठिकाण निवडले आहे. तेथे खरात, त्याचा शिपाई नीरज जाधवसह संबंधितांची सखोल चौकशी केली जात आहे. नाशिक, अहिल्यानगरसह मुंबई, पुण्यातील महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.

जमीन विकताच शेतकऱ्याचा मुलगाही गायब

नाशिकच्या पाथर्डीजवळील वाडीचे रान येथील शेतकरी शिवाजी ढगे यांची 20 गुंठे जमीन खरातने ऑक्टोबर 2025 मध्ये खरेदी केली. खरे तर शिवाजी यांना हा व्यवहार मान्यच नव्हता. मुलगा अजय याने कुटुंबाचा विरोध असतानाही खरातला जमीन दिली. त्यानंतर काही दिवसांतच अजय बेपत्ता झाला. याबाबत 26 ऑक्टोबर रोजी कुटुंबाने इंदिरानगर पोलिसांत तो 25 ऑक्टोबरपासून बेपत्ता असल्याची तक्रार दिली. मात्र, अजूनही त्याचा शोध लागलेला नाही. त्यामुळे कुटुंब चिंतेत आहे. खरातचे अनेक कारनामे समोर आल्यानंतर त्यानेच मुलाला गायब केल्याचा संशय या कुटुंबाने प्रसार माध्यमांसमोर व्यक्त केला आहे.

चाळीस महिलांचे संपर्क क्रमांक हस्तगत

खरातच्या नाशिकमधील कार्यालयातील शिपाई नीरज जाधवकडून सुमारे 40 महिलांचे संपर्क क्रमांक पथकाने हस्तगत केले आहेत, त्यांच्याशी संपर्क साधण्यात येणार आहे. खरातने कोणाकोणाला धमकावले, कोणाचे शोषण केले, याची माहिती समोर येणार आहे. नीरजसह पुण्याचा राजेंद्र जासूद आणि भायखळा येथील दिनेश परब अशा तिघांनी खरातला खंडणीपोटी धमकावले होते, तिघांना अडकवण्याच्या प्रयत्नात खरातच तोंडघशी पडला होता. त्या तिघांचाही कसून तपास सुरू आहे.

‘आयकर’कडून चौकशी होणार

खरातने मंत्र-तंत्राच्या नावाखाली अनेकांना गंडा घातला आहे तसेच हजारहून अधिक कोटींची मालमत्ता जमवली आहे. पाथर्डी, गौळाणे, आडगाव, सिन्नर, मिरगावसह अहिल्यानगर जिह्यातील कोपरगाव, शिर्डी भागात त्याच्यासह कुटुंबीयांच्या नावे जमिनी आहेत. यासह त्याच्या सर्व व्यवहारांची पडताळणी, उत्पन्नाचे स्रोत यांची चौकशी आयकर विभागाकडून होणार आहे.

पुजाऱ्यासह कर्मचारी ताब्यात

सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील खरातच्या शिवनिका ट्रस्टच्या ईशान्येश्वर मंदिरातील पुजारी आणि दोन कर्मचाऱ्यांनाही एसआयटीने ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे. या फार्म हाऊस व परिसरात खरातने काय काय प्रताप केले, किती माया गोळा केली, याचा शोध घेतला जात आहे.

Comments are closed.