ट्रम्प यांच्या 48 तासांच्या अल्टिमेटमने आगीत तेल, होर्मुझ पूर्ण बंद करण्याची इराणची धमकी; आखातातील सर्व तेल व गॅस प्रकल्प उडवण्याचाही इशारा
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज युद्धाच्या आगीत तेल ओतले. होर्मुझची सामुद्रधुनी 48 तासांत खुली करा, अन्यथा इराणचे ऊर्जाप्रकल्प नष्ट करू अशी धमकी त्यांनी दिली. त्यामुळे इराण खवळला आहे. अमेरिकेने आमच्या तेल व गॅस प्रकल्पांना लक्ष्य केल्यास होर्मुझची सामुद्रधुनी वाहतुकीसाठी पूर्ण बंद करू आणि आखातातील गॅस व तेलाचे सर्व प्रकल्प उडवून टाकू, अशी धमकी इराणने दिली आहे. त्यामुळे युद्ध आणखी भडकण्याची भीती आहे.
इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्धाचा आजचा 23 वा दिवस आहे. अमेरिका-इस्रायलने जंगजंग पछाडूनही इराण माघार घ्यायला तयार नसल्याने टेन्शन वाढले आहे. जगाची ऊर्जा काsंडी पह्डण्यासाठी होर्मुझचा मार्ग इराणने खुला करावा अशी मागणी हिंदुस्थानसह अनेक देशांनी केली होती. त्यास प्रतिसाद देत इराणने अमेरिका-इस्रायल आणि त्यांचे मित्र देश वगळता इतर देशांसाठी होर्मुझ खुली करण्याची घोषणा केली. मात्र, हा मार्ग सर्वांसाठी खुला करा असा अल्टिमेटम अमेरिकेने दिला आहे. तो इराणने धुडकावून लावला आहे.
इराणचा इस्रायलमध्ये मिसाईल हल्ला; 200 हून अधिक जखमी
अमेरिकेला प्रत्यक्ष टार्गेट न करू शकणाऱया इस्रायलवर इराणने आग ओकणे सुरूच ठेवले आहे. इस्रायलमधील अरड आणि डिमोना शहरांतील अणुप्रकल्पांजवळ इराणने केलेल्या हल्ल्यात 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्यात लहान मुलांचाही समावेश आहे. याशिवाय, तेल अवीववर टाकलेल्या क्लस्टर बॉम्बमुळे 15 जखमी झाले आहेत.
अमेरिकेचे एफ-15 जेट विमान पाडले
होर्मुझ सामुद्रधुनीजवळ अमेरिकेचे एफ-15 हे लढाऊ जेट विमान पाडल्याचा दावा इराणने केला आहे. त्याचा व्हिडीओदेखील इराणने प्रसिद्ध केला आहे. अमेरिकेने अद्याप यास दुजोरा दिलेला नाही. आतापर्यंतच्या संघर्षात इराणने अमेरिकेची अर्धा डझन विमाने पाडल्याची सूत्रांची माहिती आहे.
मोदींनी घेतला ऊर्जा सुरक्षेचा आढावा
इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या तेल व गॅस तुटवडय़ाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत देशातील ऊर्जा सुरक्षिततेचा आढावा घेण्यात आला.
गॅस व तेल घेऊन दोन जहाजे हिंदुस्थानात
जगभरात ऊर्जासंकट निर्माण झालेले असताना हिंदुस्थानला आज पुन्हा दिलासा मिळाला. एलपीजीने भरलेले अमेरिकेचे अॅक्वा टायटन हे जहाज रविवारी हिंदुस्थानात पोहोचले.
Comments are closed.