उल्फाने आसाममधील कमांडो कॅम्पवर हल्ला केला
तिनसुकिया येथील घटनेत चार जवान जखमी
वर्तमानपत्र/ तिनसुकिया
आसाम राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असतानाच उल्फा (आय) गटाच्या दहशतवाद्यांनी आसाम-अरुणाचल सीमेजवळील जगुन येथील पोलीस कमांडो कॅम्पवर हल्ला केला. ही घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. संशयित दहशतवाद्यांनी पोलीस कॅम्पवर ग्रेनेड आणि आरपीजीचा वापर करत हल्ला केला. प्रसारमाध्यमांना पाठवलेल्या एका पत्रात ‘उल्फा’ने जगुन येथील आसाम पोलीस कमांडो कॅम्पवरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या बंदी घातलेल्या संघटनेने आपल्या लेटरहेडवर या हल्ल्याला ‘ऑपरेशन बुजोनी’ असे नाव दिले आहे. दरम्यान, रात्री उशिरा झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय लष्कर आणि पोलिसांनी आसाम-अरुणाचल सीमेवरील भागात शोधमोहीम तीव्र केली आहे.
कॅम्पवर हल्ला झाल्यानंतर आसाम पोलिसांच्या जवानांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. या चकमकीत आसाम पोलिसांचे चार जवान जखमी झाले. दरम्यान, चकमकीनंतर हल्लेखोर दहशतवादी जंगलात पळून गेले. जखमींना दिब्रुगढ येथील आसाम मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी पोलिसांची ओळख पटली असून त्यात जोरहाट येथील चित्तरंजन मिली आणि देबाशीष बोरा, चाबुआ येथील रवी गढ आणि गोलपारा येथील जंबुश मारक यांचा समावेश आहे. हे सर्व तिनसुकियाच्या जगुन येथील पोलीस छावणीत तैनात होते. जखमी पोलिसांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने जाहीर केले आहे.
Comments are closed.