राज्याचे कॅरमपटूही होणार ‘मेन इन ब्ल्यू’
आजवर क्रिकेट असो किंवा फुटबॉल अशा मोठय़ा खेळांच्या संघांच्या टी शर्ट अनावरणाचा कार्यक्रम पाहायला मिळायचा. मात्र आता महाराष्ट्र कॅरम संघटनेनेही आपल्या कॅरमपटूंसाठी रंगीत टी शर्ट तयार केले असून तेसुद्धा टीम इंडियाच्या मेन इन ब्ल्यूच्या धर्तीवर आपल्या खेळाडूंनाही ब्ल्यू केले आहे. राज्यातील खेळाडूंसाठी तयार केलेल्या टी शर्टचा अनावरण सोहळा सुप्रसिद्ध विकासक विजय पाटील यांच्या हस्ते तर विश्वविजेते प्रशांत मोरे व संदीप दिवे यांच्या उपस्थितीत पार पडला.
हिंदुस्थानचा खेळ असलेल्या कॅरमने गेल्या काही वर्षांत या खेळाचा अनेक देशांमध्ये प्रचार आणि प्रसार केला आहे. या खेळावर महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपले वर्चस्व अबाधित राखले आहे. आजवर अनेक जागतिक स्पर्धांमध्ये मुंबईच्या अनेक खेळाडूंनी जगज्जेतेपद पटकावण्याचा पराक्रम केला आहे. आजवर कॅरम स्पर्धांमध्ये बहुतांश खेळाडू हे पांढऱया टी शर्टमध्येच सहभागी व्हायचे. कॅरमचे पांढरे टी शर्ट करण्याची मूळ कल्पनाही मुंबई कॅरममध्ये सर्वप्रथम राबविण्यात आले होती आणि ती गेले अनेक वर्षे अविरतपणे आणि सातत्याने राबविली जात होती. आता त्याच पावलांवर पाऊल ठेवत राज्य कॅरम संघटनेही आपल्या खेळाडूंना मेन इन ब्ल्यू केले आहे. कॅरमच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने जवळपास 200 पेक्षा जास्त खेळाडू, पंच व कॅरमप्रेमी या कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र कॅरम संघटनेचे सचिव अरुण केदार यांनी राज्य कॅरम संघटनेच्या खेळाच्या हितासाठी घेतलेल्या अनेक निर्णयाची माहिती दिली. नवीन वर्षात संघटनेने महिलांच्या बक्षिसात व पंचांच्या मानधनात वाढ केली असून विश्व अजिंक्यपद व विश्व कप जिंकणाऱया खेळाडूला रोख पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. राज्याचे प्रतिनिधित्व करणारा संघ यापुढे वातानुकूलित रेल्वेने प्रवास करेल अशी तरतूद करण्यात आली आहे. शिवाय खेळाडूंना यापुढे ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी लागणार आहे. त्यामुळे यापुढे राज्य संघटनांच्या स्पर्धेत सारेच खेळाडू एकाच रंगात दिसतील. अध्यक्ष जितेंद्र शाह यांनी या कार्यक्रमाचे काwतुक करत खेळाडूंच्या हितासाठी आणखी काही महत्त्वाचे निर्णय लवकरच घेणार असल्याची माहिती दिली.
Comments are closed.