दिल्ली कॅपिटल्सचा मास्टरप्लॅन बदलला! आता केएल राहुल ‘या’ नव्या भूमिकेत दिसणार

आयपीएलच्या नवीन हंगामाची सुरुवात होणार आहे. यावेळी दिल्ली कॅपिटल्सचा संघ अत्यंत मजबूत दिसत असून जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. संघाची धुरा पुन्हा एकदा अक्षर पटेलच्या खांद्यावर असेल. आयपीएल २०२५ मध्ये हा संघ प्लेऑफमध्ये जागा मिळवण्यात अपयशी ठरला होता. त्यामुळे, फ्रँचायझीने यावेळी रणनीतीमध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. संघाचा अनुभवी फलंदाज केएल राहुल या हंगामात नवीन क्रमांकावर फलंदाजी करताना दिसेल. संघाचे मुख्य प्रशिक्षक हेमंग बदानी आणि कर्णधार अक्षर पटेल यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

​दिल्ली कॅपिटल्ससाठी केएल राहुल आयपीएल २०२६ मध्ये ओपनिंग (सलामीला) करताना दिसेल. गेल्या हंगामात व्यवस्थापनाने सुरुवातीला त्याच्यावर मधल्या फळीत फलंदाजीची जबाबदारी सोपवली होती, परंतु नंतर तो सलामीवीर म्हणून खेळला होता. याबद्दल बोलताना कर्णधार अक्षर पटेल म्हणाला, “गेल्या वर्षी संघाच्या संयोजनामुळे (Team Combination) तो मधल्या फळीत खेळत होता. दुखापत आणि इतर कारणांमुळे त्याला नंतर प्रमोट करण्यात आले होते.” संघाचे मुख्य प्रशिक्षक हेमंग बदानी यांनी सांगितले की, “गेल्या २ वर्षांत टी-२० क्रिकेटमध्ये सलामीच्या फलंदाजांची भूमिका खूप वाढली आहे. अशा परिस्थितीत संघ यावेळी राहुलला ओपनिंगला खेळवणार आहे.”

​आयपीएलमध्ये सलामीवीर म्हणून केएल राहुलची आकडेवारी अत्यंत थक्क करणारी आहे. त्याने सलामीवीर म्हणून आतापर्यंत १०३ सामने खेळले असून, १३८.१४ च्या स्ट्राईक रेटने ४,४१८ धावा कुटल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी ४९.६४ इतकी राहिली आहे. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत ५ शतके झळकावली असून ही सर्व शतके सलामीला फलंदाजी करतानाच आली आहेत. या काळात तो तीन वेगवेगळ्या संघांसाठी खेळताना दिसला. २०२० मध्ये पंजाब किंग्सकडून खेळताना तो संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज (ऑरेंज कॅप विजेता) ठरला होता.

Comments are closed.