Mumbai News – गोरेगाव परिसरात 9 वर्षाच्या मुलीच्या अपहरणाचा डाव, चिमुकलीच्या धाडसामुळे प्रयत्न फसला
गोरेगाव पश्चिममध्ये एका 9 वर्षाच्या मुलीचे अपहरणाचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बांगुरनगर पोलिसांनी आरोपी महिलेला बेड्या ठोकल्या आहेत. चंद्राबेन वाघारी असे आरोपी महिलेचे नाव असून ती त्याच परिसरातील सिद्धेश्वर सोसायटीमध्ये राहते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार रेखा खान या भगतसिंग नगर येथे राहत असून घरकाम करतात. रेखा यांनी त्यांची धाकटी मुलगी निशाला 21 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास तिची मैत्रीण गायत्रीकडे मिठाई देण्यासाठी पाठवले होते. त्यानंतर रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास खान यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोनवरून त्यांना निशा रस्ता चुकल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर काही वेळातच, त्यांना दुसऱ्या एका अनोळखी क्रमांकावरून पुन्हा फोन आला. या फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने निशा रडत असल्याचे सांगून खान यांना सुविधा चाळीमध्ये येण्यास सांगितले. यानंतर रेखा यांनी तात्काळ तिकडे धाव घेतली.
एका महिलेने आपला हात पकडला आणि मिठाई देण्याचे आमिष दाखवून तिला आपल्यासोबत येण्यास सांगितले; तसेच तिला सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, असे निशाने आईला सांगितले. घाबरलेल्या निशाने स्वतःची सुटका करून एका अनोळखी व्यक्तीच्या मोबाईलवरून आपल्या आईशी संपर्क साधला. रेखा यांनी तात्काळ बांगुरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ त्या महिलेला ताब्यात घेतले.
Comments are closed.