VIDEO: आरसीबीच्या ऐतिहासिक विजयाच्या आठवणीत विराट कोहली भावूक; फायनलमधील ‘त्या’ सर्वात कठीण क्षणाचा केला खुलासा

18 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) अखेर आयपीएल 2025 मध्ये आपले पहिले विजेतेपद पटकावले. फायनलमध्ये पंजाब किंग्सचा 6 धावांनी पराभव करून आरसीबीने दुष्काळ संपवला. या विजयानंतर संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) खूपच भावूक झाला होता. आता आयपीएल 2026 सुरू होण्यापूर्वी कोहलीने त्या ऐतिहासिक विजयाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

आरसीबीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये विराट कोहली 2025 च्या फायनलमधील विजयाबद्दल बोलताना दिसतोय. कोहली म्हणाला, आमच्यासाठी ती रात्र अत्यंत खास होती. मी पहिल्या दिवसापासून या संघासोबत आहे आणि माझ्यासोबत रमेश माने (संघाचे केअरटेकर) आहेत. आम्ही या ग्रुपमधील सर्वात जुने सदस्य आहोत.

विराट पुढे म्हणाला, जेव्हा आम्ही फायनलमध्ये पोहोचलो, तेव्हा मला एक प्रकारचा शांत आणि आत्मविश्वासपूर्ण अनुभव येत होता. पण फायनल जिंकणे सोपे नसते, हेही मला ठाऊक होते. समोरचा संघही इथपर्यंत खूप मेहनत करून पोहोचलेला होता, त्यामुळे त्यांचाही आत्मविश्वास मोठा होता.

यापूर्वी 2009, 2011 आणि 2016 मध्ये बंगळुरूचा संघ फायनलमध्ये पराभूत झाला होता. याबद्दल बोलताना विराट म्हणाला, याआधी अनेकदा विजयाच्या जवळ पोहोचूनही आम्हाला अपयश आले होते. पण त्या अपयशानेच आम्हाला यावेळी धीर धरण्याची आणि अधिक जिद्दीने खेळण्याची प्रेरणा दिली. आमचा हा विजय कोणताही योगायोग किंवा ‘तुक्का’ नव्हता, तर आम्ही चांगल्या संघांना हरवून मेहनतीने इथपर्यंत पोहोचलो होतो.

फायनलमध्ये पंजाबला शेवटच्या ओव्हरमध्ये 27 धावांची गरज होती. जोश हेझलवूडने पहिले दोन चेंडू ‘डॉट’ टाकताच सामना जवळपास आरसीबीच्या खिशात आला होता. तरीही कोहलीसाठी तो वेळ कठीण होता. त्याबद्दल कोहली म्हणाला, सामना आपल्या हातात आहे हे माहित असतानाही शेवटचे काही क्षण कठीण असतात. मला फक्त एकच वाटत होतं की जोशने ‘नो बॉल’ टाकू नये. शेवटच्या तीन चेंडूंची वाट पाहणे, हा त्या रात्रीचा सर्वात कठीण भाग होता.

विजयाच्या क्षणाबद्दल बोलताना विराट पुढे म्हणाला, ती पूर्ण रात्रच अप्रतिम होती. माझ्यासाठी सर्व काही स्वप्नवत होते, माझा विश्वासच बसत नव्हता. 18 वर्षांचा हा संपूर्ण प्रवास, त्यातील चढ-उतार, चांगले-वाईट क्षण एखाद्या फ्लॅशबॅकसारखे डोळ्यासमोरून गेले. त्या भावना शब्दांत मांडणे कठीण आहे, तो अनुभव मी कधीही विसरणार नाही.

Comments are closed.