दिलासादायक बातमी! कच्च्या तेलाच्या किंमतीत 13 टक्क्यांची घसरण, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा

कच्च्या तेलाची किंमत: मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. आशियामध्ये भारतीय चलनावर याचा विशेष परिणाम होत असून, डॉलरच्या तुलनेत ते 94.01 पर्यंत घसरले आहे. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय घसरण नोंदवली गेली आहे. इराणसोबत वाटाघाटी सुरू आहेत. इराणच्या वीज प्रकल्पांवर कोणताही हल्ला होणार नाही असे ट्रम्प यांनी म्हटलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून वाटाघाटी सुरू असून पुढील काही दिवस त्या सुरू राहतील असे ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

व्यापारादरम्यान ब्रेंट क्रूड 15 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल 36 डॉलरवर आले. 11 मार्चनंतर प्रथमच त्याची किंमत 100 डॉलरच्या खाली घसरली होती. वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (WTI) देखील 13.5 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल 85.25 डॉलरवर आले.

इराण युद्धाबाबत ट्रम्प यांचा मोठा दावा

डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणसोबत चर्चा सुरू आहे आणि सध्या इराणच्या वीज प्रकल्पांवर कोणताही हल्ला होणार नाही. गेल्या दोन दिवसांपासून चर्चा सुरू असून पुढील काही दिवस ती सुरूच राहील. परिणामी, पुढील पाच दिवस तेहरानच्या वीज प्रकल्पांना लक्ष्य केले जाणार नाही. ट्रम्प यांच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाच्या किमती सुमारे 10 टक्क्यांनी घसरल्या, ज्यामुळे जागतिक बाजारांना काहीसा दिलासा मिळाला.

वाटाघाटी करण्यास इराणचा नकार

दुसरीकडे, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या दाव्यांच्या विरुद्ध, इराणने अमेरिकेसोबत कोणतीही शांतता चर्चा झालेली नाही असे सांगून प्रत्युत्तर दिले आहे. तेहरानने ट्रम्प यांचा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे.
इराणची वृत्तसंस्था IRNA नुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या वीज प्रकल्पावर हल्ला न करण्याचा निर्णय इराणकडून मिळालेल्या इशाऱ्यानंतर घेतला. या अहवालात असेही म्हटले आहे की, मध्यस्थांमार्फतही इराणशी कोणताही संपर्क झालेला नाही.

इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यामुळे तेल आणि वायू पुरवठ्यावर परिणाम

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आता चार आठवड्यांपासून सुरू आहे आणि शांततेची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. दरम्यान, इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यामुळे तेल आणि वायू पुरवठ्यावर परिणाम झाला असून, जागतिक ऊर्जा संकट अधिक गंभीर झाले आहे. याचा परिणाम भारतासह अनेक देशांमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे.

आणखी वाचा

Comments are closed.