Python Blood Research: अजगराच्या रक्ताने कमी होईल लठ्ठपणा; धक्कादायक रिसर्च समोर




अजगराच्या रक्ताने कमी होईल लठ्ठपणा; धक्कादायक रिसर्च;


वजन कमी करण्यासाठी अनेक जण डायट, व्यायाम आणि जीवनशैलीत बदल यावर भर देतात. काही जण तर वजन कमी करण्यासाठी औषधेही घेतात. मात्र काहीही केले तरी त्याचा परिणाम दिसत नाही. उलट त्या औषधांमुळे मळमळ, उलट्या अशा प्रकारचे त्रास होतात. पण नुकतेच शास्त्रज्ञांनी लठ्ठपणावरील उपायासाठी एक रिसर्च केले आहे. त्यातून अजगराच्या रक्ताने लठ्ठपणा कमी होईल असे सांगण्यात आले आहे. तुम्हालाही हे ऐकून धक्का बसला ना? पण हे खरे आहे. ( Python Blood For Weight Loss )

संशोधकांना अजगराच्या रक्तात एक असा घटक सापडला आहे, जो कोणत्याही दुष्परिणामांशिवाय भूक नियंत्रित करण्यास फायदेशीर ठरतो. अजगराच्या रक्तातील पीटीओएस (para-tyramine-O-sulfate) नावाचा रेणू लठ्ठपणा कमी करू शकतो. अजगर एकाचवेळी स्वतःच्या वजनाइतके शिकार खाऊ शकतो. त्यानंतर कित्येक महिने अन्नाशिवाय राहू शकतो. जड शिकार खाल्ल्यानंतर अजगराच्या रक्तातील pTOS रेणूची पातळी १००० पटींनी वाढते. यामुळेच कित्येक महिने अजगर अन्नाविना जगू शकतो.

उंदरांवर चाचणी
शास्त्रज्ञांनी लठ्ठ उंदरांवर pTOS रेणूची चाचणी केली. तेव्हा त्यांची भूक कमी झाली आणि सुमारे एकाच महिन्यात त्यांचे वजन ९%ने कमी झाले. शिवाय यादरम्यान त्यांच्यात अशक्तपण किंवा इतर कोणतेही दुष्परिणाम दिसून आले नाही. संशोधनातून असे दिसून आले आहे की, अजगरांच्या आतड्यांमधील जीवाणू जेवणानंतर pTOS नावाचा हा रेणू तयार करतात. हा रेणू रक्तप्रवाहाद्वारे थेट हायपोथॅलॅमसवर (मेंदूचा भूक नियंत्रित करणारा भाग) परिणाम करतो आणि पोट भरलेले असल्याचा संदेश शरीराला मिळतो. pTOS हा रेणू मानवी शरीरात खूप कमी प्रमाणात असतो. जेव्हा एखादा व्यक्ती पोटभर जेवतो तेव्हा या रेणूचे प्रमाण किंचित वाढते.

शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की भविष्यात या आधारावर कोणत्याही दुष्परिणामांशिवाय लठ्ठपणा कमी करणारे औषध विकसित केली जाऊ शकते. मात्र हे संशोधन सध्या प्राथमिक टप्प्यात आहे. मानवांवर यशस्वी चाचणी झाल्यानंतरच त्याचे फायदे आणि तोटे समोर येतील.



Comments are closed.