पंजाबचे माजी मंत्री लालजीत भुल्लरला अटक.

गगनदीप सिंग रंधावा आत्महत्या प्रकरणात कारवाई

वृत्तसंस्था/ चंदीगड

पंजाब वेअरहाउसिंग कॉर्पोरेशनचे जिल्हा व्यवस्थापक गगनदीप सिंग रंधावा यांच्या आत्महत्या प्रकरणात सोमवारी मोठी कारवाई करण्यात आली. पोलिसांनी माजी मंत्री लालजीत सिंग भुल्लर यांना अटक केली आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निर्देशानुसार फतेहगड साहिब पोलिसांनी मंडी गोविंदगड येथून त्यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, अटकेपूर्वी भुल्लर यांनी इंटरनेटवर आत्मसमर्पण केल्याची घोषणा करणारी एक पोस्ट शेअर केली होती.

गगनदीप सिंग रंधावा यांनी 21 मार्च रोजी आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणाला गती मिळाली. रंधावा यांच्या मृत्यूमागे माजी मंत्री लालजीत भुल्लर यांच्यावर छळ आणि मानसिक दबाव आणल्याचा आरोप होता. मृत अधिकाऱ्याने आत्महत्येपूर्वी बनवलेला एक व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओमध्ये, रंधावा यांनी कथितरित्या माजी मंत्र्याला आपल्या त्रासाचे कारण म्हणून नाव दिले होते. त्यानंतर, कुटुंबीयांनी भुल्लर यांच्यावर छळ, धमक्या आणि मानसिक दबाव आणल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. कुटुंबीयांच्या तक्रारी आणि व्हिडिओच्या आधारे, पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे, माजी मंत्र्याला आता अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे राजकीय पातळीवर खळबळ उडाली आहे.

Comments are closed.