35 कोटींचे कमिशन कार्यकर्त्यांना सोडले, संजय गायकवाड यांचे धक्कादायक विधान
माझ्यासोबत सायकलवर फिरणारे कार्यकर्ते आज फॉर्च्युनरमध्ये फिरतात. जवळपास 35 कोटी रुपयाचं माझं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलंय, असे धक्कादायक विधान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे.
बुलढाण्यात रविवारी एका कार्यक्रमात मार्गदर्शन करताना शिंदे गटाचे आमदार गायकवाड म्हणाले, आमच्या मतदारसंघातील एकाही व्यक्तीने छळ झाला असं सांगावं. आमची ताकद आम्ही गोरगरीबांना पाठिंबा देण्यासाठी, कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी वापरतो. माझ्यासोबत सायकलवर फिरणारे कार्यकर्ते आज फॉर्च्युनरमधून फिरतात. जवळपास माझं 35 कोटींचं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलं. तुम्ही खंबीर झालात तर मी खंबीर होईन, असे विधान केल्याने गायकवाड पुन्हा एकदा वादाच्या भोवऱयात सापडले आहेत.
माघार… सारवासारव
माझ्या हाताला समस्या असल्यापासून माझी बोबडी वळते आणि शब्द अडखळतात. कालच्या एका बैठकीत मी ठेकेदारांऐवजी कार्यकर्त्यांना 35 कोटींची कामं दिली असे बोललो. कामाऐवजी कमिशन हा शब्द तोंडात आला. त्यामुळे गैरसमज झाला, अशी सारवासारव त्यांनी केली.
Comments are closed.