प्रयागराजमध्ये कोल्ड स्टोरेज दुर्घटनेत ४ ठार

विषारी अमोनिया वायू एक किलोमीटरपर्यंत पसरला

वृत्तसंस्था/ प्रयागराज

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सोमवारी दुपारी सुमारे 1:30 वाजता एक कोल्ड स्टोरेज इमारत कोसळली. या दुर्घटनेदरम्यान सुमारे 20 कामगार ढिगाऱ्याखाली गाडले गेले. सायंकाळपर्यंत ढिगाऱ्याखालून 9 जणांना बाहेर काढण्यात आले. त्यापैकी 4 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. अपघातानंतर कोल्ड स्टोरेजमधून अमोनिया वायूची गळती सुरू झाली. वायूचा दुर्गंध सुमारे एक किलोमीटरपर्यंत पसरला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने 5 जेसीबींच्या मदतीने बचावकार्य सुरू केले होते. एसडीआरएफ आणि एनडीआरएफची पथके घटनास्थळी दाखल झाली होती.

कोल्ड स्टोरेज दुर्घटनेसंबंधी काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.  वायूगळतीनंतर परिसरात दुर्गंधी पसरल्यामुळे बहुतेक लोक कापडाने आपले तोंड झाकून जीव वाचविण्यासाठी पळत असल्याचे निदर्शनास येत होते. हा अपघात फाफामऊ परिसरात घडला. या घटनेमुळे लोक संतप्त झाले आहेत. पोलिसांनाही विरोधाचा सामना करावा लागला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, आधी कोल्ड स्टोरेजमध्ये स्फोट झाला आणि त्यानंतर इमारत कोसळली.

आदर्श कोल्ड स्टोरेज नावाची ही इमारत सपा नेते आणि माजी मंत्री अन्सार अहमद यांची आहे. हे कोल्ड स्टोरेज सुमारे 5,000 चौरस फूट जमिनीवर बांधले आहे. त्यापैकी सुमारे 1,500 चौरस फूट भाग कोसळला. तिथे 100 हून अधिक लोक काम करत होते. पोलिसांनी कोल्ड स्टोरेज व्यवस्थापक आणि अन्सार अहमद यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांना ताब्यात घेतले आहे.

Comments are closed.