Colombia plane crash – कोलंबियात लष्करी विमान कोसळून भीषण अपघात; 66 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दक्षिण अमेरिकेतील कोलंबियामध्ये सोमवारी एक मोठी विमान दुर्घटना घडली. कोलंबियन हवाई दलाचे ‘सी-130 हर्क्युलिस’ (C-130 Hercules) हे लष्करी विमान उड्डाण केल्यानंतर काही वेळातच कोसळले. या भीषण अपघातात आतापर्यंत 66 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे विमान ॲमेझॉनच्या घनदाट जंगल परिसरात कोसळले असून दुर्घटनेनंतर विमानाला मोठी आग लागली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, या विमानात एकूण 125 प्रवासी प्रवास करत होते, ज्यात 114 प्रवासी (प्रामुख्याने लष्करी सैनिक) आणि 11 कर्मचाऱ्यांचा समावेश होता. पुटुमायो प्रांतातील पोर्तो लेगुइझामो विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच हे विमान जमिनीवर आदळले. सोशल मीडियावर या अपघाताचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओंमध्ये दुर्घटनेनंतर आकाशात धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा स्पष्टपणे दिसत होत्या. या अपघातात अनेक जवान गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच तात़डीने बचावकार्य सुरू करण्यात आले. बचाव कार्यादरम्यान आतापर्यंत 77 जणांना वाचवण्यात यश आले आहे, मात्र अद्याप अनेक जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विटरवर (X) पोस्ट करत म्हटले की, ही एक अत्यंत धक्कादायक घटना असून प्रशासकीय अडथळ्यांमुळे लष्करी विमानांचे आधुनिकीकरण रखडल्याची कबुली त्यांनी दिली आहे. तसेच त्यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले असून दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

प्राथमिक तपासानुसार, विमानात असलेल्या दारूगोळ्याचा स्फोट झाल्यामुळे आग अधिक भडकली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की अन्य काही कारणामुळे, याचा तपास सध्या सुरू आहे. लष्करी तुकड्या आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी युद्धपातळीवर मदतकार्य राबवत असून, जखमींना उपचारांसाठी बोगोटा येथे हलवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

Comments are closed.