पाकिस्तानी गुप्तहेर फरिदाबादमध्ये अटक

आतापर्यंत 22 जण चौकशीसाठी ताब्यात

वृत्तसंस्था/ लखनौ

गाझियाबाद पोलिसांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या टोळीचा सदस्य नौशाद अली उर्फ लालू याला फरिदाबादमधून अटक केली आहे. नौशाद केवळ या टोळीचा सदस्यच नव्हता, तर वर्षभरापूर्वी तो नाचोली गावातील एका खुल्या पेट्रोल पंपावर पंक्चर दुरुस्तीचे दुकानही चालवत होता. याप्रकरणी आतापर्यंत टोळीचा म्होरक्या सुहेल (मेरठ) याच्यासह एकूण 22 आरोपींना ताब्यात घेत सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. टोळीचे सदस्य व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे पाकिस्तानातील संशयितांना रेल्वे स्थानके आणि सुरक्षा दलांच्या तळांचे फोटो आणि व्हिडिओ पाठवत असत आणि प्रत्येक फोटोसाठी त्यांना 4,000 ते 6,000 रुपये मिळत असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

नौशाद व्यतिरिक्त पोलिसांनी मथुरा जिह्यातील सदर पोलीस ठाण्यांतर्गत मीरा येथील रहिवासी असलेल्या आणखी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. आरोपींपैकी एक जण अजूनही अल्पवयीन आहे. प्राथमिक चौकशीदरम्यान सुहेलने त्यांना या टोळीत भरती केले होते, असे तिन्ही आरोपींनी सांगितले. डीसीपी सिटी धवल जयस्वाल यांच्या नेतृत्त्वात यासंबंधी सखोल तपास सुरू आहे.

पोलिसांच्या तपासानुसार, नौशादने सुमारे तीन महिन्यांपूर्वी नाचोली येथील एका खुल्या पेट्रोलपंपावर पंक्चरचे दुकान उघडले होते. तो मूळचा बिहारमधील मुझफ्फरपूरच्या हरचंदा गावचा आहे. 16 मार्चच्या संध्याकाळी, गाझियाबाद पोलिसांचे एक पथक ठिकाणाच्या माहितीनुसार साध्या वेशात पेट्रोलपंपावर पोहोचले. अधिकाऱ्यांनी प्रथम पंपावरील कर्मचाऱ्यांना त्यांची नावे आणि मूळ ठिकाण विचारले. नौशाद जवळच उभा होता, पण पोलिसांनी सुरुवातीला त्याच्याकडे दुर्लक्ष केले. जेव्हा पोलिसांनी कर्मचाऱ्यांना नौशाद अलीबद्दल विचारले, असता तो पंक्चर दुकानाचा मालक लालू असल्याचे त्यांना समजले. नंतर, पोलिसांनी त्याला अटक करून त्याचा मोबाईल फोन जप्त केला असता त्यातून अनेक सबळ पुरावे पोलिसांच्या हाती लागले.

Comments are closed.