चिन्नास्वामी स्टेडियममधील 11 सीट्स रिकाम्या राहणार! चेंगराचेंगरीमधील मृतांच्या स्मरणार्थ कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचा निर्णय

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या (आरसीबी) पहिल्या आयपीएल विजेतेपदाच्या जल्लोषावेळी एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये १४ वर्षाच्या मुलासह ११ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. ही घटना ४ जून २०२५ या दिवशी घडली. त्यादिवशी झालेली ही दु:खद घटना आजही मनाला भिडते. त्या ११ जणांच्या आठवणींसाठी कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने (केएससीए) आरसीबीसोबत एक निर्णय घेतला आहे.

आयपीएल २०२६ च्या हंगामातील पहिला सामना आरसीबी विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद असा होणार आहे. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर केएससीए स्टेडियमच्या आतील प्रवेशद्वाराजवळील भित्तीचित्रापाशी एका स्मारक फलकाचे अनावरण करणार आहे. आनंद आणि दु:ख या दोन्ही घटना अनुभवलेल्या या स्टेडियममध्ये स्मरणासाठी एका जागा निर्माण करणे, हा या मागचा हेतू आहे.

त्या घटनेत ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या स्मरणार्थ स्टेडियममधील ११ जागा कायमस्वरुपी राखीव ठेवल्या जातील. आंतरराष्ट्रीय सामन्यांसह कोणत्याही सामन्यांसाठी त्या जागेचे तिकीट विकले जाणार नाही. तसेच सामन्याच्या दिवशी (२६ मार्च) आरसीबीचा संघ खेळ सुरू होण्याआधी श्रद्धांजली अर्पण करेल. स्टेडियममध्ये त्या पीडीत लोकांची नावे दर्शवली जातील आणि एक मिनिटांचे मौन पाळले जाणार आहे.

केएससीएच्या योजनांना दुजोरा देताना अध्यक्ष व्यंकटेश प्रसाद म्हणाले, “त्या दु:खद घटनेचा विचार करणेही वेदनादायी आहे, मात्र आम्ही व्यवस्थापन समिती आणि इतर प्रमुख हितधारकांसोबत मागील काही काळापासून याबाबत चर्चा करत होतो.”

चिन्नास्वामी स्टेडियमवर ती घटना घडल्यामुळे काही काळ सामने खेळण्याची परवाणगी दिली जात नव्हती. आयपीएल २०२६ साठी आधी तेथिल सुरक्षेचा आढावा घेण्यात आला आणि नंतर सामने खेळण्याची मंजुरी दिली आहे. यावरून चिन्नास्वामी स्टेडियमवर स्पर्धात्मक क्रिकेट परतत आहे. तेथे घडलेली ती घटना लोकांच्या कायम लक्षात राहिल यासाठी हा श्रध्दांजली दिली जाणार आहे.

Comments are closed.