देश सोडण्याची तयारी, कोट्यवधींची प्रॉपर्टी अन् महिलांवर अत्याचार; विधानसभेत अशोक खरातच्या गुन्ह्यांची मुख्यमंत्र्यांनी मांडली कुंडली

भोंदूगिरी, जादूटोणा आणि महिलांवरील अत्याचाराच्या गंभीर आरोपांखाली अटकेत असलेला अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांची कुंडली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडली. अशोक खरात हा देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी अत्यंत कौशल्याने त्याला बेड्या ठोकल्या असून, या प्रकरणाचा तपास आता विशेष तपास पथकामार्फत (SIT) केला जात असल्याची माहिती फडणवीस यांनी निवेदनाद्वारे सभागृहात दिली.

विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की, “अशोक खरात याचे प्रकरण सुरुवातीला एका खंडणीच्या तक्रारीवरून समोर आले होते. २९ जानेवारी २०२५ रोजी खरातने स्वतः वावी पोलीस स्टेशनमध्ये पाच कोटींच्या खंडणीची तक्रार दिली होती. आरोपी दिनेश परब आणि राजेंद्र जासूद यांनी आपले अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे त्याने तक्रारीत म्हटले होते. मात्र, सायबर विभागाने जेव्हा खरातच्या मोबाईलची तांत्रिक तपासणी केली, तेव्हा त्याने केलेले आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. उलट या तपासातूनच खरातच्या भीषण गुन्ह्यांची मालिका उघडकीस आली.”

ते म्हणाले की, “फेब्रुवारी २०२६ मध्ये शिर्डी येथे एका महिलेने अश्लील फोटो शेअर केल्याप्रकरणी नीरज जाधव नावाच्या व्यक्तीविरुद्ध तक्रार दिली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान योगेश भालेराव या साक्षीदाराने धाडस दाखवून पोलिसांना काही व्हिडीओ दिले. या पुराव्यांनी पोलीसही चक्रावून गेले. या व्हिडीओमध्ये तब्बल ८ महिलांचे ३५ अश्लील व्हिडीओ आढळले. खरात याने भोंदूगिरी, जादूटोणा आणि तंत्रमंत्राचा आधार घेऊन अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढले आणि त्यांच्यावर बलात्कार तसेच अश्लील चाळे केल्याचे यातून स्पष्ट झाले. हा साक्षीदार खरातच्या दहशतीमुळे सुरुवातीला पुरावे देण्यास तयार नव्हता, मात्र पोलिसांनी त्याला सुरक्षेची हमी दिल्यानंतर हे सत्य समोर आले.”

फडणवीस म्हणाले, “गुन्ह्यांचे गांभीर्य पाहून खरात देश सोडून पळून जाण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिसांनी १० मार्च २०२६ रोजी एअरपोर्ट अथॉरिटीला अहवाल सादर करून त्याच्या विरोधात लुकआऊट सर्कुलर जारी केले, ज्यामुळे त्याचे परदेशात जाण्याचे मार्ग बंद झाले. या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने १३ मार्च रोजी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करून तपास वेगवान करण्यात आला.”

लाखो खरातांची कोट्यवधींची प्रॉपर्टी

देवेंद्र फडणवीस यांनी अशोक खरातच्या मालमत्तेबद्दल माहिती देताना सांगितले की, “आरोपीकडे केलेल्या चौकशीतून आणि प्राप्त माहितीवरून त्याची विविध ठिकाणी असलेली मालमत्ता समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे त्याची स्वतःच्या नावावर ३३ एकर जमीन आणि एक फार्महाऊस आहे. नाशिकमधीलच पाथरडी आणि गवाणे गावात १० एकर जमीन, तर सिन्नरमध्ये ६ एकर जमीन आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे साडेचार एकर आणि शिर्डी विमानतळाजवळील काकडी येथे सव्वा पाच एकर जमीन त्याच्या नावावर आहे. तसेच नाशिकच्या पाथरडी फाट्यावर ८०० स्क्वेअर फुटाचा एक फ्लॅट, ओझर येथे ४ गुंठ्याचे तीन प्लॉट, आडगाव येथे ५ गुंठ्याचा प्लॉट आणि कर्मयोगी नगर येथे स्वतःचा बंगला आहे. याशिवाय नवी मुंबईतील पनवेल येथे ४० गुंठ्यांचा प्लॉट आणि नाशिकच्या कॅनडा कॉर्नर येथे १८० स्क्वेअर फुटाचे ऑफिस आहे. त्याने आपल्या मुलीच्या नावावर संगमनेर येथे ११ गुंठ्यांचा प्लॉट आणि पुण्यामध्येही एक प्लॉट खरेदी केला आहे. याव्यतिरिक्त, शिर्डी येथे भागीदारीमध्ये’साई सिल्वर ओक नावाचे मंगल कार्यालय असून सिन्नरमध्ये पाच जणांच्या भागीदारीत ६ एकर जमीन आहे. दागिन्यांच्या स्वरूपात स्वतःकडे १२ तोळे आणि पत्नीकडे २० तोळे सोने आहे, तसेच पत्नीच्या नावे डीमॅट खात्यात १ ते २ लाखांची गुंतवणूक आहे. त्याची आयसीआयसीआय, युनियन, सारस्वत, विश्वास को-ऑपरेटिव्ह आणि एसबीआय अशा एकूण पाच बँकांमध्ये खाती आहेत. या सर्व मालमत्तेचे एकूण बाजार मूल्य ४० कोटी ८७ लाख रुपये इतके आहे. तपासात असेही समोर आले आहे की खरातने अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, युएई, साऊथ आफ्रिका, इथोपिया, टांझानिया, केनिया, इंडोनेशिया, मलेशिया, पेरू, युगांडा आणि कंबोडिया अशा अनेक देशांचा प्रवास केला आहे. या सर्व मालमत्तेबाबत आयजीआर आणि आयकर विभागाला पत्र पाठवण्यात आले असून, यापेक्षा जास्त मालमत्ता असण्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीने सखोल तपास सुरू आहे.”

Comments are closed.