Dapoli News – कवी केशवसूत यांच्या वळणेतील स्मारकाला मुहूर्त कधी मिळणार ?
‘ब्राह्मण नाही, हिंदूही नाही, ना मी एक पंथाचा’ तेच पतित की, जे आखडती प्रदेश साकल्याचा’, अशी वैचारिक क्रांतीची काव्यसुमने त्या काळी लिहिणाऱ्या कृष्णाजी केशव दामले ऊर्फ कवी केशवसुत यांचे वळणे येथील घर भग्नावस्थेत पडले आहे.
कवी केशवसुतांचे हे ठिकाण पाहण्यासाठी साहित्यिक , पर्यटक मोठ्या संख्येने येथे येत असतात मात्र येथे येण्यासाठी रस्ता तसेच मार्गदर्शक फलक नसल्याने त्यांना काहीच माहिती मिळत नाही त्यामुळे केशवसुतांच्या स्मृती जपण्यासाठी शासनाने पुढाकार घेतल्यास येथे आलेल्यांची निराशा होणार नाही.
विषय आणि अभिव्यक्ती या सर्वार्थाने आधुनिक कवितेचे जनक ठरलेल्या कवी केशवसुतांचे दापोली तालुक्यातील दापोली जालगाव दाभोळ मार्गावर वळणे हे गाव आहे. केशवसुतांच्या काव्य प्रतिभेची खरी सुरवात याच वळणे गावातून झाली. केशवसुतांचे जन्मगाव रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड असले तरी दापोली येथील वळणे येथे काहीकाळ त्यांचे वास्तव्य होते.
निसर्गरम्य वळणे गावातील एक वाहती नदी, तेथील निसर्ग रम्य अशा हिरव्यागार ठिकाणी केवड्याच्या वासाच्या सुमधुर मनमोहक सुंगध दरवळणारा केवड्याचा बन त्याचप्रमाणे नारळी, पोफळी, आंबा, काजू आणि विविध प्रकारच्या जंगली वन संपदेच्या वृक्ष वेलींनी नटलेल्या रम्य परिसराने केशवसुतांच्या मनातील काव्य प्रतिभा जागृत होत वळणे येथे केशवसुतांच्या एकापेक्षा एक अशा कितीतरी काव्य पंगतीच्या कवितांनी आकार घेतला. या काव्यांचा सुगंध केवळ वळणे वा दापोली पुरताच सिमित राहीला नाही तर तो अनेकांच्या ओठी कविता गुणगुणत सर्वदूर दरवळला. मात्र हेच ते केशवसुतांच्या वास्तव्याचे ठिकाण असलेले वळणे गावातील त्यांचे घर सध्या भग्नावस्थेत पडले असून सद्यस्थितीमध्ये घराच्या पडलेल्या भिंती व घराचे जोत्याच्या बांधकामाचे फक्त अवशेषच काही ते पाहण्यापुरतेच शिल्लक राहिले आहेत.
वळणे येथील कवी केशवसुतांच्या घराच्या सुधारणेबाबत कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक आणि जेष्ठ कवी मधू मंगेश कर्णिक यांनी ते महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक महामंडळाचे अध्यक्ष असताना यासाठी प्रयत्न केले होते. मात्र योग्य प्रतिसाद न मिळाल्याने आजच्या घडीला फक्त काय त्या आठवणीच शिल्लक राहिल्या आहेत.
केशवसुतांना ज्या ठिकाणी काव्य संपदा स्फुरली त्या दापोली तालुक्यातील वळणे गावात केशवसुतांची स्मृती कायम राहण्यासाठी त्यांच्या सध्या भग्नावस्थेतील घराची सरकारने विशेष बाब म्हणून सुधारणा करून ते ठिकाण स्मारक म्हणून जतन करावे अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे. असे झाल्याने येथील पर्यटन वाढेल शिवाय अभ्यासक कवी लेखक आदी येथे येणा-या साहित्यिकांना कवी केशवसुत यांच्या पवित्र स्मारकाची पायधुळ किमान कपाळावर लावता येईल.
आज सदय स्थितीत वळणे येथील केशवसुतांच्या भग्नावस्थेत असलेल्या घराकडे जाण्यासाठी रस्ता नाही त्यामुळे तेथे पोहोचणे अवघड होते. कवी केशवसुतांचे रत्नागिरी येथील मालगुंड येथे स्मारक असले तरी ख-या अर्थाने केशवसुतांनी सर्वप्रथम दापोली तालुक्यातील वळणे येथेच काव्य रचना करण्यास सुरुवात केली त्यामुळे दापोली तालुक्यातील वळणे गावी सध्या त्यांचे भग्नावस्थेत पडलेल्या घरावरच स्मारक उभारून केशवसुतांच्या स्मृती जपल्या तर नवोदित लेखक कवींना अधिकचे प्रोत्साहन मिळेल.
मराठी साहित्यविश्वात दापोलीचं नाव ज्या साहित्यिकांनी अजरामर केलं त्यापैकी आधुनिक मराठी काव्याचेजनक केशवसुत यांचे दापोलीतील वळणे या गावातील तत्कालीन निवासस्थानाच्या ठिकाणी मालगुंड येथील स्मारकाच्या धर्तीवर स्मारक विकसीत व्हावे ही दापोलीकरांची जुनीच मागणी आहे. या मागणीकडे सर्व संबंधीत सातत्याने दुर्लक्ष करीत आहेत. केशवसुतांचे सदर निवासस्थान पुर्णत:कोसळण्याच्या स्थितीत आहे आता तरी लोकप्रतिनिधींनी त्यात जातीने लक्ष घालण्याची गरज आहे.
Comments are closed.