Market Unhealthy Foods: बाजारात मिळणारे हे हेल्दी फूड आरोग्यासाठी कितपत सुरक्षित?
आजकाल बाजारात अनेक पदार्थ मिळतात, जे हेल्दी असल्याचा दावा केला जातो. बहुतांश फिटनेस फ्रीक लोक दररोज या पदार्थांचे सेवन करतात. पण बाजारात मिळणारे हे हेल्दी फूड आरोग्यासाठी चांगले असतातच असे नाही. कारण त्यात खूप प्रमाणात साखर, कलर आणि इतर हानिकारक घटक असू शकतात. त्यामुळे तुम्हीही जर हे पदार्थ रोज आहारात घेत असाल तर सावध व्हा… ( Market Unhealthy Foods )
फळांचा रस
रोजच्या धावपळीत ताज्या फळांचा रस करण्यासाठी वेळ नसतो. त्यामुळे अनेक जण बाजारातील पॅकेज्ड ज्यूस पितात. या ज्यूसच्या पॅकेजिंगवर ते हेल्दी असल्याचा दावा केला जात असला तरी त्यात अतिरिक्त रंग आणि साखर असते. तसेच पॅकेज्ड ज्यूसमध्ये फायबरचे प्रमाणही खूप कमी असते. त्यामुळे शक्यतो ताज्या फळांचा रसच घेण्याचा प्रयत्न करावा.
ओट्स
सध्या ओट्स हा नाश्त्यासाठी अनेकांचा आवडीचा पदार्थ बनला आहे. त्यातही वेळेच्या अभावामुळे लोक इन्स्टंट ओट्स खातात. पण इन्स्टंट ओट्सवरही खूप प्रक्रिया केलेली असते आणि त्यातही अतिरिक्त रंग आणि साखरेचे प्रमाण असते. हे ओट्स चवीला खूप स्वादिष्ट असले तरी इन्स्टंट ओट्स खाणे टाळावे. तुम्ही स्टील-कट ओट्स खाऊ शकता कारण ते पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात.
ब्राऊन ब्रेड
ब्राऊन ब्रेड हा सकाळच्या नाश्त्यासाठी घेतला जाणारा आणखी एक लोकप्रिय पदार्थ आहे. ब्राऊन ब्रेड हेल्दी असल्याचा अनेकांचा समज असतो. शिवाय बाजारात ब्राऊन ब्रेड अनेकदा संपूर्ण गव्हाचा किंवा मल्टीग्रेन असल्याचा दावा करून विकला जातो पण त्यात इतर घटकांचे प्रमाण खूप कमी असते आणि मुख्यतः रिफाइंड पिठापासून ( मैदा ) तो बनवलेला असतो. रोजच्या नाश्त्यासाठी ब्राऊन ब्रेड खाणे टाळावे. तुम्ही आठवड्यातून एखादा दिवस खाऊ शकता.
दही आणि लस्सी
पॅकेज केलेले फ्लेवर्ड दही किंवा लस्सी बाजारात सहज उपलब्ध असतात. पण फ्लेवर्ड दही किंवा लस्सीमध्ये विविध फ्लेवर्स आणि रसायने असतात आणि त्यात साखरेचे प्रमाणही जास्त असते.
शुगर- फ्री उत्पादने
अनेक जण साखर नको म्हणून शुगर- फ्री लेबल असलेली पॅकेज्ड उत्पादने विकत घेतात. पण पॅकेज केलेल्या उत्पादनांमध्ये रिफाइन्ड साखर, उच्च फ्रक्टोज कॉर्न सिरप (HFCS) किंवा लपवलेले साखरेचे प्रकार उदा. माल्टोडेक्स्ट्रीन असे घटक असू शकतात. या पदार्थांचे दीर्घकाळ सेवन केल्याने लठ्ठपणा, टाईप-२ मधुमेह, हृदयविकार आणि दातांच्या समस्या होऊ शकतात.
Comments are closed.