इंडियन पॉलिटिल लीग सुरू झालीय का? देशात-राज्यात संभ्रमावस्था, कोण-कोणाबरोबर आहे तेच कळत नाहीये?; उद्धव ठाकरे यांचा महायुतीवर टोला

“सध्या जे काही एक वातावरण आहे राज्यात आणि देशामध्ये, एक संभ्रमावस्था आहे. कोण कोणाबरोबर आहे तेच कळत नाहीये. आता या महिन्यामध्ये आयपीएल सुरू होईल आणि आयपीएल बघताना आपण म्हणतो, अरे हा आपला होता ना? अरे नाही, तो आता त्या टीममध्ये. अरे हा आपला होता, हा तिकडे गेलेला. म्हणजे हे इंडियन पॉलिटिकल लीग नवीन सुरू झाले की काय? कोण कोणाच्या बरोबर तेच कळत नाहीये, असा टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारला लगावला आहे. विधान परिषदेत ९ आमदारांचा कार्यकाळ संपत असून आज सभागृहात निवृत्त होणाऱ्या 9 आमदारांना निरोप देण्यात आला. याचवेळी बोलताना ते असे म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे म्हणाले की, “एकच संघ खूप मजबूत होत चाललाय. बाकीचे संघ, म्हणजे मॅच खेळायला सुद्धा बाकीचे संघ हवेत की नको? की बाकीचे संघ संपवून टाकले तर एकटा संघ काय करणार? तो सुद्धा विचार केला पाहिजे की एकच संघ ठेवला तर मॅच खेळणार कोण कोणाबरोबर? सगळेच खेळाडू जर का आपल्या संघात घेतले तर काय करणार काय तुम्ही? त्याच्यामुळे मला असं वाटतं, एका सुदृढ लोकशाहीसाठी ही संभ्रमावस्था सगळ्यांनी संपवणं गरजेचं आहे. जनतेचा आपल्याबद्दलचा जो विश्वास आहे. जनतेला असं वाटतंय की हे राजकारणासाठी काहीही करू शकतात, पण आपल्यासाठी सुद्धा हे काहीतरी करू शकतात, हा विश्वास आपण जनतेच्या मनात निर्माण करण्याची गरज आहे.”

भाषांची सुरुवात करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “विधानपरिषदेत का यावं, सहा वर्ष यावं की, नाही? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण निरोपाच्या दिवशी मात्र आवश्य यावं. कारण आपल्याबद्दल जे काही ऐक्याला मिळतं, तेव्हा तुमच्या मनात जे काही होतं, हे या दिवशी कळतं. तसं पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे म्हणाले ते अगदी खरं आहे. माझा पिंड हा राजकारणाचा नाही, माझा मूळ स्वभाव हा कलाकाराचा आहे. एवढं उत्तम वर्णन तुम्ही केल्यानंतर एवढं तुम्ही जवळून ओळखता म्हटल्यानंतर, ऐसी कौनसी बात थी कि और किसी का हाथ पकडना पडा. मी या विधिमंडळात मुख्यमंत्री म्हणून आलो होतो, काही गोष्टी आयुष्यात अशा घडतात की, आपल्या ध्यानीमनी नसतं आणि अचानक ती जबाबदारी येते. जबाबदारी आल्यानंतर त्यातून पळ काढणं, हे मर्दाचं लक्षण नाही. ती जबाबदारी स्वीकारली. मला सगळ्यांना धन्यवाद द्यायचे आहेत ते म्हणजे सर्व माझे त्यावेळेचे आजी-माजी सहकारी जे आहेत, मंत्रिमंडळात होते, त्याच्यानंतर सगळे शासकीय अधिकारी, मुख्य सचिवांपासून इतर सगळे सचिव, त्याच्यानंतर सगळं प्रशासन, मग महसूल खातं असेल, पोलीस असेल, आरोग्य असेल, सर्वच खात्यांच्या सर्व अधिकाऱ्यांना, अगदी अंगणवाडी सेविका, सरपंच सर्वच या अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. कारण एक प्रशासनाचा गंधही नसलेला माणूस अचानक राज्याच्या मुख्यमंत्री पदावरती बसतो आणि तो राज्य चालवतोय, या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय हे शक्य झालं नसतं.”

उद्धव ठाकरे म्हणाले, “मुख्यमंत्री महोदय, आपण स्वतः मला निरोप द्यायला अगत्याने हजर राहिलात, त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद देतोय. आणि मला तोही दिवस आठवला आणि त्या दिवसाची आठवण मी तुम्हाला करून देणार आहे. पण काल एकूण जे काही विधिमंडळात घडलं ते बघितल्यानंतर तो दिवस मला का आठवला ते सांगतो. कारण आपणच म्हणाला होतात ज्ञानेश्वरांचं भारुड ‘ताट्याच्या आणीवर वसली तीन गावे, दोन ओसाड एक वसई चिना’. आता त्या गावची पाटीलकी आपल्याकडे… आता ते आणीवरच्या तीन गावांमध्ये एक एक गाव आणीवर गेलेलं आहे, बाकी गावांचं काय झालंय हे त्या गावकऱ्यांना माहिती आहे.

‘तर या बुवांची दुकानं बंद झाल्याशिवाय राहणार’

भोंदूबाबा अशोक खरातबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “ज्ञानेश्वरांची आठवण आल्यानंतर एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की ज्ञानेश्वर महाराज कोणत्या शतकात होऊन गेले? बाराव्या-तेराव्या. त्यावेळेला ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद म्हणून घेतले होते. आता त्यापासून आतापर्यंत आपण या शतकात आल्यानंतर स्वार्थासाठी रेडे कापले जातात, हा कोणता महाराष्ट्र कोणत्या दिशेने चाललेला आहे? आणि आपलं स्टेटमेंट मी कालच्या सभागृहातलं काळजीपूर्वक ऐकलं, नाशिकच्या बाबत जे आपण एक भूमिका घेतली त्याच्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतोय. आणि हे धन्यवाद देत असताना काल आपले एक सिने कलावंत आहेत अतुल कुलकर्णी, त्यांचं एक चांगलं वक्तव्य आहे की जे पकडले जातात ते c, पण जे पकडले जात नाही त्या महाराजांचं काय करायचं? मला असं वाटतं आपण सगळे एकत्र मिळून एक भूमिका घ्यायला पाहिजे आणि सगळ्या राजकारण्यांनी जर ठरवलं तर बुवाशक्तीपेक्षा युवाशक्तीला जास्त आपण ताकद दिली पाहिजे. कारण या देशामध्ये बुवा चमत्कार नाही करू शकत, युवा चमत्कार करू शकतात. आणि युवाशक्तीला जर का आपण नीट पाठिंबा दिला तर या बुवांची दुकानं बंद झाल्याशिवाय राहणार नाहीत.”

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, “मला आज आठवतोय तो माझा मुख्यमंत्री पदाचा पहिला, जसा आपला गृहप्रवेश असतो तसा मंत्रालयातला प्रवेश. संपूर्ण मंत्रालय असं बहरून आलं होतं, खिडक्यांतून लोक डोकावत होती, काही पॅराफीटवर उभी होती, काही बाहेर आली होती, सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक आनंद होता. तो आनंद बघून मी तो क्षण विसरू शकत नाही, भारावून गेलो होतो. त्याच्यानंतर दिवस पटपट निघून गेले आणि ज्या दिवशी मी ‘वर्षा’ सोडून बाहेर पडलो, तेव्हा हे लालावलेला महाराष्ट्र बघून मी गहीवरून गेलो होतो की हे सगळं प्रेम या महाराष्ट्राने आपल्याला दिलं. हे असं प्रेम फार थोड्या लोकांच्या नशिबामध्ये येतं. मला आठवतंय की मी मुख्यमंत्रीपद म्हणजे वर्षा सोडला आणि मातोश्रीत आलो. मुख्यमंत्रीपद सोडलेलं नव्हतं, एक दोन-चार दिवसांनंतर ते सोडलं आणि त्या काळामध्ये साहजिकच आहे घरी बसून म्हणजे मातोश्रीत बसून मी कारभार करत होतो. अनेक मंत्री सुद्धा घरीच येत होते, घरीच बसून त्याच घरातून त्यांना पदं दिली होती, ती घरी बसूनच दिली होती. पण काही अधिकारी माझ्यासोबत नेहमी यायचे दोन-चार दिवस कारण सरकारी काम थांबू शकत नव्हतं. सगळी कामं झाल्यानंतर एका अधिकाऱ्याने मला विचारलं सहज, कारण जसं नेहमी बोलतो तसं मी बोलत होतो, हसत-खेळत त्यांच्याबरोबर चर्चा करत होतो. आणि ते बघितल्यानंतर एका अधिकाऱ्याने मला विचारलं, ‘सर एक विचारू का?’ म्हटलं विचारा काय? ‘सर तुम्ही मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना जसे होतात, तसेच आज सुद्धा आहात, हे कसं काय?” माझ्या मनात पटकन आलं, मी म्हटलं काय की जे आपलं नसतं ते स्वीकारण्यात आनंद होण्याची गरज नसते, आवश्यकता नसते आणि आपलं नसतं ते सोडण्यामध्ये दुःख होण्याची तरी काय गरज आहे? त्याच्यामुळे जसं मुख्यमंत्रीपद अचानक आलं तसं मुख्यमंत्रीपद गेलं, मी माझ्या घरी आलो. त्याच्यामुळे माझं घर आणि त्या घरातला आनंद हा सगळ्यात महत्त्वाचा, हा मला वाटतं प्रत्येकासाठी असतो. “

Comments are closed.