Ashok Kharat अशोक खरात याला 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी
महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी अटकेत असलेला राजकीय ज्योतिषी अशोककुमार खरात याला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आज अशोक खरात याला नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.
अंकशास्त्र आणि विश्वशास्त्र्ााचा अभ्यासक असलेला ज्योतिषी अशोक खरात याने गुंगीचे औषध दिले, संमोहन करून बलात्कार केल्याची तक्रार एका महिलेने दिल्यावरून खरात याला गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली आहे. अशोक खरात याच्या कारनाम्यांची फाइल्स उघडताच महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. महायुती सरकारमधील अर्धा डझनहून अधिक मंत्री खरात फाइल्समध्ये अडकल्याचे सांगितले जात आहे.
नाशिकमधील एका महिलेने केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीमुळे झालेल्या अटकेनंतर भोंदूबाबा कॅप्टन खरात याचे कारनामे उघडकीस येऊ लागले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात थेट एसआयटी नेमून चौकशीचे आदेश दिले आहेत.
गर्भवतीवर अत्याचार
अशोक खरात याने एका गर्भवती महिलेवर देखील अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या महिलेच्या पतीला केबिनबाहेर बसवून त्याने पूजाविधीच्या नावाखाली गर्भवती महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. पोटातील बाळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि रक्षणासाठी माझा आशीर्वाद हवा आहे, मला प्रसन्न करण्यासाठी मला विरोध करू नको, असे सांगून त्याने या गर्भवती महिलेवर बलात्कार केला.
घटस्फोटितेचा सहा वर्षे लैंगिक
या विकृताने तब्बल सहा वर्षे एका महिलेला छळले, घटस्फोट घेण्यास भाग पाडून लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. नंतर गर्भपात घडवून सतत ब्लॅकमेल केल्याचे देखील समोर आले आहे. विवाहित असताना ‘तुझ्या भाग्याविषयी बोलायचे आहे, संसारातील वाद-विवाद मिटवू,’ असे सांगून त्याने बोलावले. कार्यालयात मंतरलेले पाणी प्यायला देऊन विधीच्या नावाखाली वेळोवेळी अत्याचार केला, पुढे घटस्फोटानंतर पुन्हा अतिप्रसंग केले, ती त्याच्यापासून गर्भवती राहिली हे कळताच गर्भपात घडवून आणला.
Comments are closed.