Mumbai News – इंजेक्शनच्या भीतीमुळे लस घेतली नाही, रेबिजमुळे 9 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इंजेक्शनच्या भीतीमुळे लस न घेतल्याने 9 वर्षाच्या चिमुकलीचा रेबिजमुळे मृत्यू झाल्याची घटना मुंबईत घडली. कशिश सहानी असे मयत मुलीचे नाव असून ती इयत्ता चौथीत शिकत होती. या घटनेनंतर महापालिकेने कशिशच्या कुटुंबीयांची आणि तिच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सहा महिन्यांपूर्वी कशिश तिच्या आजोबांसोबत फिरायला गेली असताना एका कुत्र्याने तिला ओरबडले होते. त्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, इंजेक्शनची प्रचंड भीती वाटत असल्याने कशिशने लस घेण्यास नकार दिला. कुटुंबीयांनीही तिला लस घेण्यासाठी फारसा आग्रह धरला नाही.

सुरुवातीचे काही दिवस तिची प्रकृती सामान्य होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून कशिशची प्रकृती अचानक खालावू लागली. प्रकृती चिंताजनक झाल्याने तिला तातडीने मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रेबीजचा संसर्ग संपूर्ण शरीरात पसरला होता. डॉक्टरांनी तिला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र त्यांना यश आले नाही. अखेर सोमवारी तिची प्राणज्योत मालवली.

Comments are closed.