हॅरी ब्रूकनंतर आता ‘या’ खेळाडूवर बीसीसीआय घालणार बंदी! आयपीएलला केलेला रामराम पडणार महागात

आयपीएलच्या नवीन हंगामाच्या (IPL Season 19) सुरुवातीपूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. टीमचा स्टार सलामीवीर फलंदाज बेन डकेटने (Ben Ducket) आयपीएल 2026 मधून आपले नाव मागे घेतले आहे. डकेट या हंगामामध्ये दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) भाग होता. आयपीएल 2026 पूर्वी झालेल्या मिनी ऑक्शनमध्ये दिल्ली फ्रँचायझीने डकेटला 2 कोटी रुपयांच्या किमतीत खरेदी केले होते. डकेटच्या या निर्णयामुळे आता त्याच्यावर आयपीएलमधून बंदी घातली जाईल. यामुळे आता तो पुढची 3 वर्षे आयपीएलसाठी स्वतःची नोंदणी करू शकणार नाही.

आयपीएलच्या नियमांनुसार, जर एखादा परदेशी खेळाडू लिलावात विकला गेल्यानंतर स्पर्धेतून आपले नाव मागे घेतो, तर त्याला बंदीचा सामना करावा लागतो. इंग्लंडचा सध्याचा व्हाईट बॉल कॅप्टन हॅरी ब्रूकने (Harry Brook) 2025 मध्ये असेच केले होते आणि त्याच्यावर 3 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. त्याने मेगा ऑक्शनमध्ये विकले गेल्यानंतर माघार घेतली होती, तर बेन डकेटने मिनी ऑक्शनमध्ये विकले गेल्यानंतर दिल्लीची साथ सोडली आहे. नियमानुसार त्याच्यावर 3 वर्षांची बंदी घातली जाईल, ज्यामुळे डकेट आता 2029 मध्येच या स्पर्धेत परत येऊ शकेल.

बेन डकेटने सोशल मीडियाद्वारे याबद्दल माहिती दिली आहे. त्याने लिहिले, मला हा कठीण निर्णय घ्यावा लागत आहे की मी यावेळच्या आयपीएलमधून माझे नाव मागे घेत आहे. मी याबद्दल खूप विचार केला आणि हे अजिबात सोपे नव्हते. इंग्लंडसाठी खेळणे हे लहानपणापासून माझे स्वप्न होते आणि मला माझे सर्वस्व इंग्लंड क्रिकेटला द्यायचे आहे. यासाठी मला माझी शारीरिक आणि मानसिक फिटनेस टिकवून ठेवावी लागेल. दिल्ली कॅपिटल्सची मी यासाठी माफी मागतो. मी या संधीसाठी खूप उत्साहित होतो. मी सर्व चाहत्यांचीही माफी मागतो.

Comments are closed.