IPL 2026: RCB vs SRH सामन्याचे सर्वात स्वस्त आणि महागडे तिकीट कितीला? जाणून घ्या सविस्तर अपडेट

आयपीएल (IPL 2026) चा थरार 28 मार्चपासून सुरू होत आहे. 19 व्या हंगामातील पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात खेळला जाईल. बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. गेल्या वर्षी चॅम्पियन बनल्यामुळे आरसीबीचा आत्मविश्वास खूप वाढला असून, घरच्या मैदानावर विजयाने सुरुवात करण्याचे त्यांचे लक्ष्य असेल. दुसरीकडे, हैदराबादचा संघ चॅम्पियन आरसीबीला हरवून मोठा उलटफेर करण्याच्या प्रयत्नात असेल.

हा सामना बेंगळुरूमध्ये होणार असल्याने हजारो चाहते स्टेडियममध्ये उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सामन्याला आता फक्त 3 दिवस शिल्लक असल्याने तिकिटांसाठी चाहत्यांची मोठी ओढाताण सुरू आहे. या सामन्याची तिकिटे ऑनलाइन पद्धतीने वेगाने विकली जात आहेत. चाहते रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या अधिकृत वेबसाईट royalchallengers.com वर जाऊन ऑनलाइन पेमेंटद्वारे आपली तिकिटे बुक करू शकतात.

आरसीबीच्या वेबसाईटवर तिकीट विभागात जाऊन तुम्ही पहिल्या सामन्याचे तिकीट खरेदी करू शकता. या सामन्यासाठी सर्वात स्वस्त तिकिटाची किंमत 3,750 रुपये आहे, तर सर्वात महागड्या तिकिटाची किंमत चक्क 47,000 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. ज्या वेगाने तिकिटांची विक्री होत आहे, ते पाहता ही तिकिटे कधीही ‘सोल्ड आउट’ (संपू) शकतात.

Comments are closed.