‘हे फुटबॉल नाही…’ धोनीच्या इंपॅक्ट प्लेअर भूमिकेवर या दिग्गजाने केली टीका!

आयपीएल २०२६ स्पर्धेची सुरूवात येत्या २८ मार्चपासून होणार आहे. स्पर्धेतील पहिल्या लढतीत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. तर चेन्नई सुपर किंग्ज संघाचा सामना पहिला सामना राजस्थान रॉयल्स संघाविरूद्ध होणार आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे, एमएस धोनी या हंगामातही खेळताना दिसून येणार आहे. धोनीने चेपॉकच्या मैदानावर कसून सराव केला आहे. त्याच्या सरावाचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. दरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने धोनीच्या निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
आयपीएल स्पर्धा सुरू होण्याआधी एकच प्रश्न उपस्थि होतो, तो म्हणजे धोनी या हंगामानंतर निवृत्ती घेणार का? कारण धोनीने २०२० मध्ये निवृ्त्तीची घोषणा केली होती. त्यामुळे लवकरच तो आयपीएलमधूनही निवृत्ती जाहीर करू शकतो, अशी चर्चा रंगली होती. मात्र, ६ हंगाम उलटून गेले आहेत. तो अजूनही पूर्णपणे फिट आहे आणि चेन्नईचं प्रतिनिधित्व करत आहे. दरम्यान, धोनीने निवृत्ती का घ्यायला हवी, यामागचं कारण आकाश चोप्राने सांगितलं आहे.
जियोस्टारवर बोलताना आकाश चोप्रा म्हणाला, “तुम्ही डगआऊटमध्ये बसून खेळावर नियंत्रण ठेवू शकत नाही. तसं करायला हा फुटबॉल नाही. क्रिकेट या खेळात मैदानात उतरणं खूप गरजेचं असतं. धोनीची सर्वात मोठी ताकद म्हाणजे, त्याच्याकडे परिस्थिती इतरांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची क्षमता आहे. मला असं वाटतं की, हा त्याचा शेवटचा हंगाम असू शकतो. आता त्यांचा उत्तराधिकारी तयार आहे.”
तसेच तो पुढे म्हणाला, “संजू सॅमसन यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडू शकतो. याच हंगामात तो ही जबाबदारी पार पाडताना दिसू शकतो. पुन्हा एकदा एमएस धोनीची फिटनेस आणि त्याच्या गुडघ्याची स्थिती यावर गोष्टी अवलंबून असतील. पण तो ‘इम्पॅक्ट प्लेअर’ असू शकत नाही. जर तो पुन्हा एकदा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळणार असेल, तर मला वाटतं की त्याच्या निवत्तीची वेळ जवळ आली आहे.” आगामी हंगाम हे एमएस धोनीच्या क्रिकेट कारकिर्दीतील शेवटचे हंगाम असू शकते. तो निवृत्ती जाहीर करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Comments are closed.