तगड्या संघासाठी निवड समितीचा ‘सुपर सेव्हन’ फंडा; वशिलेबाजांना रोखण्यासाठी राज्य कबड्डीत निवडीचा नवा डाव
महाराष्ट्र कबड्डी संघाला पुन्हा दमदार उंचीवर नेण्यासाठी राज्य कबड्डी संघटनेने ‘सुपर सेव्हन निवड समिती’ हा भन्नाट आणि आक्रमक प्रयोग राबवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षांतील अपयश, वशिलेबाजीचे आरोप आणि कमकुवत निवडींच्या पार्श्वभूमीवर आता थेट सात दिग्गज खेळाडूंवर संघ निवडीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या निवड समितीची प्रत्येक चढाई-पकडीवर करडी नजर असेल. त्यामुळे ‘सुपर सेव्हन’ची ही निवड चढाई महाराष्ट्राला खऱया अर्थाने तगडा संघ देते का, याकडे संपूर्ण कबड्डीविश्वाचे लक्ष लागले आहे.
येत्या 2 ते 6 एप्रिलदरम्यान नाशिकच्या सिन्नर तालुक्यात होणाऱया राज्य अजिंक्यपद निवड चाचणीत ही सुपर सेव्हन समिती प्रत्येक चढाई, पकड आणि कोपऱ्यावर बारकाईने लक्ष ठेवणार आहे. उजवा-डावा कोपरा, उजवी-डावी चढाई, उजवा-डावा मध्यरक्षक आणि अष्टपैलू अशा सात महत्त्वाच्या स्थानांसाठी स्वतंत्र तज्ञ कबड्डीपटूंची समिती नेमण्यात आली आहे. या नव्या फंडय़ानुसार प्रत्येक सदस्य चार संभाव्य खेळाडू निवडून एकूण 28 संभाव्य खेळाडूंचा संघ तयार करेल आणि त्यातून अंतिम 12 जणांचा तगडा संघ राष्ट्रीय स्पर्धेसाठी निश्चित केला जाईल.
निवडीसाठी सात जणांची साथ
राज्य संघटनेने आपल्या सर्व संघांसाठी सात सदस्यांची निवड समिती नेमली आहे. सध्या महाराष्ट्राचा पुरुष संघ निवडण्यासाठी नीलेश शिंदे (उजवा कोपरा), गिरीश इरनाक (डावा कोपरा), आदिनाथ गवळी (उजवा मध्यरक्षक), सचिन शिंगाडे (डावा मध्यरक्षक), प्रवीण नेवाळे (डावी चढाई), संजय मोकल (उजवी चढाई) आणि रामचंद्र जाधव (अष्टपैलू) यांची समिती नेमली आहे. हाच फंडा महिला संघाच्या निवडीसाठी राबविला जाणार असून यात पूनम पाटील, सुजाता काळगावकर, किशोरी शिंदे, शोभा भगत, लता पांचाळ, शीला लुगडे, सायली जाधव यांची निवड केली आहे.
Comments are closed.