फुटीरतावादी आसिया अंद्राबी हिला जन्मठेपेची शिक्षा

देशाविरोधात युद्ध पुकारल्याप्रकरणी शिक्षा : दिल्लीतील न्यायालयाचा निर्णय

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीच्या एका विशेष न्यायालयाने मंगळवारी काश्मिरी फुटिरवादी आसिया अंद्राबीला युएपीए अंतर्गत दहशतवादाशी निगडित एका प्रकरणी आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तर तिची सहकारी सोफी फहमीदा आणि नाहिदा नसरीन यांना प्रत्येकी 30 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयाने या तिघींना प्रतिबंधित संघटना दुख्तरान-ए-मिल्लत (डीईएम)शी संबंधित कारवायांमध्ये सामील असल्याप्रकरणी 14 जानेवारी रोजी दोषी ठरविले होते.

या प्रतिबंधित संघटनेची स्थापना आसिया अंद्राबीनेच केली होती. याचबरोबर गुन्हेगारी कट आणि देशाच्या विरोधात युद्ध पुकारण्याशी संबंधित गुन्ह्यांप्रकरणी आसियाला दोषी ठरविण्यात आले आहे.

आसियाने भारताविरोधात युद्ध पुकारले होते. अशाप्रकारच्या कारवाया रोखण्यासाठी कठोर संदेश देणे आवश्यक आहे. या गुन्हेगारांनी स्वत:च्या संघटनेद्वारे जम्मू-काश्मीरमध्ये अशांतता फैलावणे आणि फुटिरवादाला बळ देण्याचे काम केले. अंद्राबीविरोधात जम्मू-काश्मीरमध्ये एकूण 33 गुन्हे नोंद आहेत. तर फहमीदा आणि नसरीन विरोधात अनुक्रमे 9 आणि 5 गुन्हे नेंद असल्याची माहिती देत एनआयएने कठोर शिक्षेची मागणी केली होती.

आसियाने 1985मध्ये जमात-ए-इस्लामीपासून वेगळे होत दुख्तरान-ए-मिल्लतची स्थापना केली होती. तिने 1990 मध्ये फुटिरवादी नेता आशिक हुसैन फक्तूसोबत विवाह केला होता. 1992 मध्ये काश्मिरी पंडित नेते एच.एन. वांचू यांची हत्या केल्याप्रकरणी तो तुरुंगात शिक्षा भोगत आहे.

Comments are closed.