जगभरातील ‘या’ ठिकाणी चालते महिलांचे राज्य




जगभरातील ‘या’ ठिकाणी चालते महिलांचे राज्य


भारतात आजही अनेक क्षेत्रांत आणि प्रामुख्याने ग्रामीण भागात पुरुषप्रधान संस्कृती पाहायला मिळते. जिथे निर्णयप्रक्रियेत पुरुषांचे वर्चस्व आणि महिलांना दुय्यम स्थान असते. आज महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडी घेत असल्या तरीही महिलांना दुर्बल समजले जाते. मात्र तुम्हाला माहित आहे का? जगभरात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे महिलांचे राज्य चालते. संपूर्ण गावाचे नेतृत्व महिला करतात.

चीन
चीनच्या युनान प्रांतात मोसो नावाचा एक प्राचीन समुदाय आहे. या समुदायात पारंपरिक विवाह पद्धत मानली जात नाही. इथे कुटुंबाचे नेतृत्व महिला करतात. आजी कुटुंबाची प्रमुख असते. तर मालमत्ताही आईकडून मुलीकडे हस्तांतरित होते. म्हणून या राज्याला ‘किंग्डम ऑफ वूमन’ असे म्हंटले जाते. इथे ‘वॉकिंग मॅरेज’ नावाची पद्धत प्रचित आहे. यात विवाह केला जात नाही तर. तर रात्री पुरुष आपल्या प्रेयसीच्या घरी जातात आणि सकाळी आपल्या घरी निघून जातात. जर एखाद्या महिलेच्या घराच्या दारावर पुरुषाची टोपी टांगलेली असेल, तर याचा अर्थ असा होतो की आत तिचा पुरुष जोडीदार आहे. ही नाती कधीकधी एका रात्रीसाठी तर कधीकधी आयुष्यभरासाठीही टिकतात, पण लोक इथे पती-पत्नी म्हणून एकत्र राहत नाहीत किंवा लग्नही करत नाहीत.

मेघालय
भारतातील मेघालयातील खासी समुदाय हा जगातील प्रमुख मातृवंशीय समाजांपैकी एक आहे. जिथे वंश, कुळाचे नाव आणि मालमत्तेचा वारसा आईकडून मुलीकडे जातो. या परंपरेत लग्नानंतर नवरा बायकोच्या घरी राहतो, मुले आईचे आडनाव लावतात आणि सर्वात लहान मुलगी वडिलोपार्जित मालमत्तेची वारसदार असते. तसेच मुलींना लग्नासाठी त्यांच्या पसंतीचा जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य असते.

इंडोनेशिया
इंडोनेशियातील पश्चिम सुमात्रा येथील मिनांगकाबाऊ (Minangkabau) हा जगातील सर्वात मोठा आणि स्थिर मातृवंशीय समाज आहे. इथे स्त्रियांना पुरुषांपेक्षा उच्च दर्जा दिला जातो. हा समाज इस्लाम धर्माचे पालन करतो. इथे पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या उच्च व निर्णायक स्थान असते. मुलीच्या कुटुंबाकडून मुलाच्या कुटुंबाला लग्नासाठी शुल्क दिले जाते. लग्नानंतर पुरुष बायकोच्या घरीच राहतात.



Comments are closed.