शेन वॉर्न क्रिकेटचे ‘वॉरेन बफेट’! ऑस्ट्रेलियन दिग्गजाकडे होता राजस्थान रॉयल्सचा 3% हिस्सा, त्याच्या कुटुंबाला मिळणार ‘इतके’ कोटी

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २००८ मध्ये सुरू झाली. तेव्हा आठ संघ खेळले होते आणि राजस्थान रॉयल्सने पहिला हंगाम जिंकला होता. तेव्हा संघाचा कर्णधार होता शेन वॉर्न. त्याचबरोबर तो राजस्थानचा प्रशिक्षक, मार्गदर्शन आणि ०.७५ टक्के मालकही होता. आयपीएलच्या इतिहासात खेळत असताना संघात मालकी हक्क असलेला शेन वॉर्न हा एकमेव खेळाडू आहे. आता या हक्कामध्ये एवढी वाढ झाली आहे की त्याची किंमत ४५० कोटी रुपयांहून अधिक आहे. आता वॉर्न क्रिकेटचा ‘वॉरेन बफेट’ कसा बनला हे जाणून घेऊ.

जेव्हा आयपीएल सुरू झाले तेव्हा वॉर्न संघाचा भाग होता. तो २००८ ते २०११ पर्यंत संघाचा भाग राहिला. या चार हंगामांमध्ये राजस्थानकडून खेळाडूच्या वेतनाच्या स्वरुपात त्याला अंदाजे ९.३५ कोटी मिळाले, तेव्हा वॉर्नने संघासमोर अट ठेवली होती, त्यामुळे त्याच्या मृत्यूनंतरही त्याच्या कुटुंबाला मोठी रक्कम मिळणार आहे.

वॉर्नने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि आयपीएलमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. निवृत्तीनंतर व्यावसायिक क्रिकेटमध्ये परतण्याचा निर्णय घेताना त्याने राजस्थान संघाच्या व्यवस्थापकांशी एक करार केला होता. त्या करारानुसार तो प्रशिक्षक, कर्णधार आणि व्यवस्थापक म्हणून काम करण्यास तयार झाला, मात्र त्याने राजस्थानच्या मालकी हक्कामध्ये दरवर्षी ०.७५ टक्के भागीदारीची मागणी केली. तो चार हंगाम खेळला आणि संघातील त्याची भागीदारी ३ टक्क्यांपर्यंत वाढली.

मंगळवारी (२४ मार्च) राजस्थानचा संघ १५३०० कोटी रुपयांना विकला गेला आहे, त्यामुळे वॉर्नच्या ३ टक्के भागीदारीप्रमाणे त्याच्या कुटुंबाला ४६० कोटी रुपये मिळणार आहेत. त्याची ही दूरदृष्टी जगातील सर्वात यशस्वी दिग्गज गुंतवणूकदार आणि उद्योगपती वॉरेन बफेट यांच्यासारखीच होती असे दिसते.

वॉर्नने राजस्थानच्या त्या ४ हंगामांमध्ये मिळून ५५ सामने खेळले आणि ५७ विकेट्स घेतल्या होत्या. २००८चा हंगाम त्याच्यासाठी सर्वात उत्तम राहिला. त्यामध्ये त्याने १९ विकेट्स घेत संघाला विजेतेपद मिळवून दिले होते.

Comments are closed.