राजस्थान रॉयल्सचा माजी खेळाडू, फर्स्ट क्लासमध्ये शतक… आता थेट आरसीबीचा बॉस! कोण आहे हा ‘नवा किंग’?

आयपीएल २०२६ सुरू होण्यापूर्वी, गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (आरसीबी) संघाला नवीन मालक मिळाला आहे. आदित्य बिर्ला ग्रुपच्या नेतृत्वाखालील एका संघाने ही फ्रँचायझी १.७८ अब्ज डॉलर्स किंवा सुमारे १६६० कोटी रुपयांना विकत घेतली आहे. २००८ मध्ये जेव्हा आयपीएल सुरू झाली, तेव्हा विजय मल्ल्याने आरसीबी सुमारे ४५४ कोटी रुपयांना विकत घेतली होती. १९ वर्षांत या फ्रँचायझीच्या मूल्यांकनात १४९५% वाढ झाली आहे. आता आर्यमन बिर्ला आरसीबीचे अध्यक्ष असतील. आर्यमन बिर्ला स्वतः एक क्रिकेटपटू असून त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले आहे. ते आयपीएलचाही एक भाग राहिले आहेत.
आर्यमन बिर्ला हे भारतातील प्रसिद्ध उद्योगपती बिर्ला घराण्यातील आहेत. ते आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांचे सुपुत्र आहेत. आर्यमन बिर्ला यांना लहानपणापासूनच क्रिकेटची आवड आहे. त्यांनी मध्य प्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळले आहे. त्यांनी २०१७ मध्ये रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले. त्यांनी २०१८ मध्ये ईडन गार्डन्सवर बंगालविरुद्ध आपले प्रथम-श्रेणी शतक झळकावले. त्या सामन्यात त्यांनी १०३ धावांची नाबाद खेळी केली. त्यांनी नऊ प्रथम-श्रेणी सामने खेळले असून २७.६० च्या सरासरीने ४१४ धावा केल्या आहेत.
विशेष म्हणजे, आर्यमन बिर्ला आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारसोबतखेळले आहेत. त्यांनी मध्य प्रदेशसाठी आपल्या प्रथम-श्रेणी आणि लिस्ट ए सामन्यांमध्ये रजत पाटीदारसोबत डावाची सुरुवात केली. आर्यमन आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचाही भाग होते.२०१८ च्या आयपीएल लिलावात आरआरने त्यांना ३० लाख रुपयांच्या मूळ किमतीत विकत घेतले होते. तथापि, त्यांना आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी कधीच मिळाली नाही. आयपीएल २०२० च्या आधी, राजस्थान रॉयल्सने बिर्लाला संघातून मुक्त केले. त्यानंतर बिर्ला यांनी मानसिक आरोग्याच्या समस्यांमुळे क्रिकेटमधून विश्रांती घेतली
क्रिकेटमधून विश्रांती घेतल्यानंतर, आर्यमन यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात प्रवेश केला. आदित्य बिर्ला ग्रुपमध्ये ते हळूहळू नेतृत्व पदांपर्यंत पोहोचले. त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीए (ऑनर्स), बेज बिझनेस स्कूलमधून ग्लोबल फायनान्समध्ये पदव्युत्तर पदवी आणि मुंबई विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदवी मिळवली आहे. सध्या ते आदित्य बिर्ला ग्रुपमधील ई-कॉमर्स, रिटेल आणि स्टार्टअप क्षेत्रांमध्ये सक्रियपणे कार्यरत असून आपली भूमिका उत्कृष्टपणे पार पाडत आहेत.
Comments are closed.