Mumbai News – 870 रुपयांच्या वादातून धक्कादायक प्रकार, ओशिवरामध्ये सिगारेट विक्रेत्याला कारने 100 मीटर फरफटत नेले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सिगारेटच्या पैशावरून विक्रेत्याला कारने तब्बल 100 मीटरपर्यंत फरफटत नेल्याची खळबळजनक घटना मुंबईतील ओशिवरा परिसरात घडली. ओशिवरा येथील लक्की बिर्याणी कॉर्नरजवळ पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

एका सफेद रंगाच्या व्हॅगनआर कारमधून आलेल्या चार जणांनी 870 रुपयांच्या सिगारेट खरेदी केल्या. चौघांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. मात्र सिगारेटचे पैसे देण्यास नकार दिल्याने विक्रेता आणि ग्राहकांमध्ये वादावादी झाली. यानंतर कारमधील महिलेने विक्रेत्याची कॉलर पकडली, तर दुसऱ्या व्यक्तीने खिडकीतून त्याला मारहाण केली. त्यानंतर चालकाने कार वेगाने पुढे नेली, ज्यामुळे विक्रेता कारसोबत 100 मीटरपर्यंत फरपटत गेला.

या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. ओशिवरा पोलीस सीसीटीव्हीच्या मदतीने अन्य आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे रस्त्यावरील विक्रेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी नागरिकांना अशा घटनांची तात्काळ माहिती देण्याचे आवाहन करत, जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

Comments are closed.