महिला क्रिकेटरने 52 चेंडूत झळकावले शतक, रोहित शर्मा खूपच मागे राहिला! वर्ल्ड रेकॉर्डचीही झाली नोंद

न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका पाचवा टी२० सामने खेळला गेला. हा सामना ख्राईस्टचर्च येथे बुधवारी (२५ मार्च) खेळला गेला. ज्यामध्ये यजमान न्यूझीलंड ९२ धावांनी जिंकला. यामध्ये न्यूझीलंडची कर्णधार एमिलिया केर हिने तुफानी फलंदाजी केली आणि भारताचा दिग्गज रोहित शर्मा याचा बलाढ्य विक्रम मागे टाकला आहे.
एमिलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या सामन्यात ५२ चेंडूतच १०० धावा पूर्ण केल्या. तिने ५५ चेंडूत १९ चौकार आणि एका षटकारासह १०५ धावा केल्या. त्यानंतर ती लागोपाठ सर्वाधिक वेळा (महिला आणि पुरुष संघ मिळून) ३० किंवा ३० पेक्षा अधिक धावा करणारी फलंदाज ठरली आहे. तिने ही कामगिरी ११ वेळा केली आहे.
या यादीत दुसऱ्या स्थानावर श्रीलंकेची चमारी अटापट्टी आणि रोमानियाची रेबेका ब्लेक आहे. या दोघींनीही अशी कामगिरी ९ वेळा केली आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये रोहित शर्मा, मोहम्मद रिझवान आणि अभिषेक शर्मा केवळ या तीन खेळाडूंनीच आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये ७ वेळा ३० किंवा ३० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
एमिलियाच्या या ११ डावांची कामगिरी पाहिली तर तिने फलंदाजीबरोबर गोलंदाजीतही कमाल केली आहे. तिने या डावांमध्ये १४० पेक्षा अधिक स्ट्राईक रेटने ६६९ धावा केल्या, ज्यामध्ये दोन शतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर गोलंदाजी करताना १२ विकेट्स घेतल्या आहेत. यामुळे ती नुकतेच आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये जलद १००० धावा आणि १०० विकेट्स घेणारी खेळाडू ठरली आहे.
या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ विकेट्स गमावत १९४ धावसंख्या उभारली. त्यामध्ये केवळ एमिलियाने सर्वोच्च धावा केल्या. तसेच जॉर्जिया प्लिमरने २७ धावा आणि ब्रूक हॅडलीने २६ धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेकडून अयाबोंगा खाका आणि तुमी सेखुखुने ३-३ विकेट्स घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव २० षटकात ९ विकेट्स गमावत १०२ धावा असा राहिला आणि त्यांनी हा सामना ९२ धावांनी गमावला. त्यामध्ये न्यूझीलंडकडून सर्वाधिक ३ विकेट्स लीया ताहुहू हीन घेतल्या.
त्यामुळे ही ५ सामन्यांची टी२० मालिका न्यूझीलंडने ४-१ अशी जिंकली.
Comments are closed.