राज्यातील पासपोर्टसह टपाल कार्यालय आरडीएक्स बॉम्बे उडवून देण्याची धमकी, छत्रपती संभाजीनगरच्या मुख्य टपाल कार्यालयास मिळाला ई-मेल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राज्यातील पासपोर्टसह टपालकार्यालय आरडीएक्स बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीच्या ई-मेलने एकच खळबळ माजली. टपाल कार्यालयाने पोलीसांना ही माहिती कळवताच तत्काळ बॉम्ब शोधक व नाशक पथकासह पोलीसांनी कार्यालयातील कर्मचार्‍यांना बाहेर काढून कार्यालयाची कसून तपासणी केली. तपासणीअंती हा ई-मेल अफवा असल्याचे स्पष्ट झाले.

शहरातील जुना बाजार भागात असलेल्या मुख्य टपाल कार्यालयास आज बुधवारी सकाळी 11.30 वाजता ई-मेल प्राप्त झाला. या ई-मेलवर तुमच्या राज्यातील सर्व पासपोर्ट कार्यालय व टपाल कार्यालयामध्ये दुपारी 12.10 वाजता सायनाइड विषारी वायू मिश्रीत 16 आरडीएक्स बॉम्बचा स्फोट होणार आहे. सर्वाना तातडीने बाहेर काढा असा संदेश प्राप्त झाला. हा ई-मेल मिळताच टपाल कार्यालयात एकच खळबळ उडाली.

टपाल कार्यालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी तातडीने पोलीसांना फोन करून बॉम्बने कार्यालय उडवून देण्याचा ई-मेल आल्याचे सांगितले. सिटीचौक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांच्यासह बॉम्ब शोधक व नाशक पथक तातडीने टपाल कार्यालयात दाखल झाले. पथकाने टपाल कार्यालयाचा कोपरा न् कोपरा तपासला. तसेच कार्यालयातील कर्मचार्‍यांना बाहेर जाण्यास सांगून कार्यालयाची तपासणी केली असता बॉम्ब सदृष्य वस्तू अथवा साहित्य आढळून आले नाही. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

Comments are closed.