‘डबल महाराष्ट्र केसरी’ हर्षवर्धन सदगीरला शरद पवारांकडून 12 लाखांची शिष्यवृत्ती, काका पवारांच्‍या तालमीला 50 लाखांचे आर्थिक सहाय्य

खासदार आणि कुस्तीचे आश्रयदाते शरद पवार यांनी डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर याला १२ लाख रूपयांची शिष्यवृत्ती दिली आहे. त्याचबरोबर काका पवार यांच्‍या पुण्यातील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलसाठी ५० लाख रुपयांचे बक्षिस देत आर्थिक सहाय्यही केले आहे.

मुंबईत हर्षवर्धन सदगीरसह अर्जून पुरस्‍कार विजेते काका पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी उद्योजक मोहसीन बागवान, कुस्ती प्रशिक्षक शिवाजी कोळी आणि महाराष्ट्र चॅम्पियन पृथ्वीराज पाटील इत्यादी मान्‍यवर उपस्‍थित होते.

हर्षवर्धन सदगीर यांचे कौतुक करीत ऑलिम्‍पिकपटू होण्यासाठी पुढील २ वर्षांसाठी महिना ५० हजार प्रमाणे १२ लाखांचे शिष्यवृत्ती धनादेश दिला आहे. काका पवार यांच्‍या तालमीतील हर्षवर्धनसह ११ मल्‍लांनी पदकाची लयलुट केल्‍याबद्दल आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलला ५० लाख रूपयांचे शरद पवार यांनी आर्थिक सहाय्य दिले आहे.

शरद पवार यांचे आभार व्यक्त करताना काका पवार म्‍हणाले, “पवार हे खेळाडूंसाठी तारणहार आणि आधार आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचे आम्ही सर्व पहिलवान आणि खेळाडू कायम ऋणी आहोत. पवार यांनी केवळ घोषणाच केली नाही तर धनादेश देऊन वेळीच विजेत्‍यांचे आणि प्रशिक्षण केंद्राचे कौतुक केले आहे. क्रिकेटनंतर इतक्‍या वेगाने पवार हेच कुस्‍तीगीरांसाठी अनेकदा धावून आले आहेत.”

हर्षवर्धन सदगीर यांनी सांगितले की, “गुरूवर्य काका पवार यांच्‍या सल्‍ल्‍यानंतर मी पुन्‍हा महाराष्ट्र केसरीच्‍या मैदानात उतरणार आहे. परंतु ऑलिम्‍पिक खेळण्याचे माझे ध्येय आहे. त्‍यासाठी शरद पवार यांची मदत प्रोत्‍साहन देणारी ठरली आहे.”

यावेळी हर्षवर्धनला शासनाकडून नोकरीचे आश्वासनही देण्यात आले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही काका पवार आणि हर्षवर्धन सदगीर यांनी भेट घेतली आहे. त्‍यावेळी येत्‍या अधिवेशनात नाशिक महानगरपालिकेत नोकरी देण्याचे आश्चासन एकनाथ शिंदे यांनी दिले असल्‍याचे काका पवार यांनी सांगितले आहे.

हर्षवर्धनने डबल महाराष्ट्र केसरी होताच मॅट प्रकारातून निवृत्ती जाहिर केली होती. तेव्हा त्याने त्यामागचे कारण स्पष्ट करताना म्हटले होते की महाराष्ट्र सरकारने तो जेव्हा २०२० मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र केसरी झाला तेव्हा त्याला विनंती करूनही नोकरी दिली नव्हती. यामुळेच त्याने ही निवृत्ती घेतली. आता त्याला शिंदेनी नोकरीचे आश्वासन दिले आहे.

Comments are closed.