केंद्रीय कृषिमंत्र्यांचे विधान निराधार किंवा कोणालातरी खुश करण्यासाठी; अंबादास दानवेंनी घेतला समाचार
शेती उत्पादन आणि उत्पादकता वाढल्यामुळे काही शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने नव्हे तर आठपटीने वाढल्याचा दावा कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लोकसभेत केला होता. चौहान यांच्या दाव्याचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी चांगलाच समाचार घेत शेतकऱ्यांचे वास्तव मांडले आहे.
याबाबत एक्सवर दानवे यांनी पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, शिवराजसिंह चौहान जी @ChouhanShivraj, मराठवाड्यात २०२१ ते २०२६ या काळात ५,०७५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. तुमच्या वक्तव्यावरून आता दोनच शक्यता वाटतात, एकतर तुमचे हे विधान निराधार असून केवळ कोणाला तरी खुश करण्यासाठी केलेले आहे, किंवा मराठवाडा हा आपल्या देशाचा भाग आहे हे कदाचित आपल्याला ठाऊकच नाही! अशा शब्दांत दानवे यांनी चौहान यांच्यावर निशाणा साधला आहे.
शिवराज सिंह चौहान जी @चौहानशिवराजमराठवाड्यात २०२१ ते २०२६ या काळात ५,०७५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. तुमच्या वक्तव्यावरून आता दोनच शक्यता वाटतात: एकतर तुमचे हे विधान निराधार असून केवळ कोणाला तरी खुश करण्यासाठी केलेले आहे, किंवा मराठवाडा हा आपल्या देशाचा भाग आहे… pic.twitter.com/4FxDJ0Pxj7
— अंबादास दानवे (@iambadasdanve) 25 मार्च 2026
गेल्या दशकात शेतकऱ्यांचे उत्पन्न लक्षणीयरीत्या वाढले आहे, काही प्रकरणांमध्ये तर ते आठ पटींपर्यंत वाढले आहे. कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लोकसभेत सांगितले की, ज्या शेतकऱ्यांनी नवनवीन कल्पना आणि पीक विविधता स्वीकारली त्यांना अधिक फायदा झाला.
मंगळवारी लोकसभेतील प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान, कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्ट केले की, सरकारच्या धोरणांचा कृषी क्षेत्रावर परिणाम झाला आहे आणि किमान आधारभूत किंमत (MSP) उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के अधिक ठेवण्याचा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे एक मोठे पाऊल ठरले आहे. अनेक विरोधी सदस्यांनी प्रश्न विचारला की, सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले. त्याच्या उत्तरात, शिवराज यांनी निदर्शनास आणून दिले की, ज्या शेतकऱ्यांनी पारंपरिक धान्य उत्पादनाऐवजी फळबाग, कडधान्ये, तेलबिया किंवा इतर नगदी पिकांकडे वळले, त्यांच्या उत्पन्नात तुलनेने अधिक वाढ झाली आहे. त्यांच्या वक्तव्याचा दानवे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
Comments are closed.